For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 14 मतदारसंघांत उद्या मतदान

06:48 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 14 मतदारसंघांत उद्या मतदान
Advertisement

दिग्गजांचा लागणार कस : 1,832 विशेष मतदान केंद्रे स्थापन

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात पहिल्या टप्प्यात (देशातील दुसरा टप्पा) होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. आता दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली असून यावेळी राज्यात 1,832 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

Advertisement

उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर-कोडगू, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या 14 लोकसभा मतदारसंघांत 26 रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीसाठी भाजप आणि निजदने युती केली असून भाजप 11 मतदारसंघांत तर निजद तीन मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे. काँग्रेस सर्व 14 मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे. दरम्यान, मतदानाच्या 48 तास अगोदर जाहीर प्रचार संपला आहे. त्यामुळे मतदारसंघाबाहेरील नेते, कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे बुधवारी रात्रीपासूनच उमेदवारांनी घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन मतयाचना केली.

अनेक दिग्गज नेरे रिंगणात

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, म्हैसूर वडेयर राजघराण्यातील यदूवीर वडेयर, माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांचे जावई आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश, माजी मंत्री व्ही. सोमण्ण, देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा तसेच अनेक मातब्बर नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

1,120 सखी मतदान केंद्रे

बेंगळूरमधील नृपतुंग रोडवरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना म्हणाले, 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम उमेदवार व मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणुकीसाठी राज्यात 1,832 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पाच अशी एकूण 1,120 सखी मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर सुरक्षा रक्षक, ‘डी’ श्रेणी कर्मचारी या सर्व महिलाच असतील. त्याचप्रमाणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तेथे दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. म्हैसूर, चामराजनगर, कोडगू, मंगळूर येथे आदिवासी लोकांची सांस्कृतिक विविधता दर्शवणारी 40 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, असे मनोजकुमार मीना यांनी सांगितले.

बेंगळूर ग्रामीण अतिसंवेदनशील मतदारसंघ

बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जात आहे. येथील सर्व मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच या मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यासाठी एकूण 7 पॅरा मिलिटरी तुकट्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.