For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणामध्ये आज मतदान; 2,290 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार

11:59 PM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणामध्ये आज मतदान  2 290 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार
Telangana Assembly elections Voting
Advertisement

119 जागांसाठी 2,290 उमेदवार : एक्झिट पोल अंदाजही आजच उलगडणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात आज गुरुवारी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपल्यानंतर आता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या ठिकाणांवरून मतदान साहित्य आणि कर्मचारी ठिकठिकाणी रवाना झाले. राज्यात 119 जागांसाठी एकूण 2 हजार 290 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर तेलंगणासह पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले जाणार आहेत. विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हे एक्झिट पोल अंदाज वर्तवले जाणार आहेत. या मतमोजणीपूर्व अंदाजांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

Advertisement

राज्यात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षानेही सत्तेत येण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सोमवारी हैदराबादमध्ये अखेरचा रोड शो केला आणि जाहीर सभांना संबोधित केले. या निवडणुकीत बीआरएस प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर), त्यांचा मुलगा केटी रामाराव, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी आणि भाजपचे लोकसभा सदस्य बंदी संजय कुमार, डी. अरविंद आणि सोयम बापूराव यांच्यासह एकूण 2,290 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. कामरेड्डी आणि गजवेलमधून केसीआर नशीब आजमावत आहेत. तर रेवंत रेड्डी हे कोडंगल आणि कामरेड्डी मधून निवडणूक लढवत आहेत. हुजूराबाद व्यतिरिक्त भाजपने गजवेल येथून आपले आमदार एटाळा राजेंद्र यांना उमेदवारी दिली आहे.

तेलंगणापूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये मतदान झाले आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला, मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान झाले. पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरलाच येतील. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या इतर चार राज्यांपेक्षा तेलंगणात निवडणुकीचा हंगाम बराच मोठा होता. या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती.

Advertisement
Tags :

.