For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे मतदान

06:21 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
देशात पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे मतदान
Advertisement

बिहारच्या नगरपालिका निवडणुकीत वापर : मोतिहारीची विभा देशातील पहिली महिला ई-मतदार

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

देशात प्रथमच मोबाईल अॅपद्वारे मतदान केले जात आहे. मोबाईल अॅपद्वारे मतदारांना मतदान करण्याची परवानगी देणारे बिहार हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. लोकशाही प्रक्रियेतील हे एक संभाव्य नवीन युग म्हणून पाहिले जात आहे. बिहारच्या 26 जिह्यांतील 42 नगरपालिकांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. यामध्ये, पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा नगरपालिकांमध्ये ई-मतदान करण्यात आले. बिहारमधील मोतिहारी येथील विभा नामक महिलेने मोबाईल अॅप वापरून पहिले मतदान करून भारतातील पहिली ई-मतदार बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

Advertisement

बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी शनिवार, 28 जून 2025 रोजी पटना, रोहतास आणि पूर्व चंपारण जिह्यातील नगरपालिकांसाठी मोबाईलद्वारे मतदान करण्यात आले. शनिवारी नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले तेव्हा मोबाईल अॅपद्वारे मतदान देखील सुरू करण्यात आले. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. एकीकडे सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमद्वारे मतदान होत असताना, दुसरीकडे घरी बसलेले मतदार मोबाईल अॅप्सद्वारेही मतदान करत होते. राज्यात एकूण 489 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. हे मतदार 538 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. पहिल्यांदाच होणाऱ्या ई-मतदानाबद्दल मतदारांना जागरूक करताना युजर्सनी आपले मोबाईल फोन नेटवर्क कार्यरत स्थितीत ठेवावे असे सांगण्यात आले आहे. ई-मतदानामध्ये काही समस्या असल्यास वॉर्ड स्तरावर आयटी टीमशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली होती.

ही सुविधा कोणाला मिळणार?

बिहार निवडणुकीसाठी सुरू केलेली ही सुविधा विशेषत: मतदान केंद्रांवर जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गर्भवती महिला, स्थलांतरित कामगार आणि इतरांसाठी तयार करण्यात आली आहे. एका मोबाईल नंबरवरून फक्त दोन नोंदणीकृत मतदार लॉग-इन करू शकतात. वैधता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मताची मतदार ओळखपत्र तपशीलांसह पडताळणी केली जाणार आहे. बिहारमधील पहिल्या पायलट प्रोजेक्टरसाठी 10 हजार मतदारांनी ई-व्होटिंगसाठी पूर्वनोंदणी केली होती. तर, 50 हजार मतदार मतदान केंद्रांवर जाण्यापूर्वीच ई-व्होटिंगच्या माध्यमातून आपला अधिकार बजावणार असल्याचे सांगितले जात आहे.

538 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार

राज्य निवडणूक आयोग पूर्ण तयारीने नवा उपक्रम राबवत आहे. मतदानाचे लाईव्ह वेबकास्टिंग बूथवरून केले जात आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळता येईल. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये एकूण मतदारांची संख्या 3,79,674 असल्याचे सांगण्यात आले.

ई-मतदान प्रणाली कशी काम करते?

► ही नवीन ई-मतदान सेवा लोकशाही प्रक्रिया सुरक्षित आणि छेडछाड-प्रतिरोधक ठेवण्यासाठी डिझाइन केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

► ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे मते सुरक्षित बदल न करता प्रणालीमध्ये रेकॉर्ड केली जातात आणि संग्रहित केली जात असल्याची खात्री होते.

► फेस ऑथेंटिकेशन आणि जुळणीमुळे मतदानादरम्यान लॉगिन व्यतिरिक्त मतदारांची ओळख पडताळण्यास मदत होते.

► डिजिटल स्कॅनिंग आणि ओसीआर (ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन) मतांची अचूक गणना करण्यास मदत करतात.

► ईव्हीएममधील व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सारखे ऑडिट ट्रेल्स मतांची खात्रीही प्रदान करतात.

► पारंपारिक मतदान प्रक्रिया समांतर चालविण्यासाठी देखील ईव्हीएम स्ट्राँगरुमवरील डिजिटल लॉक व्यतिरिक्त भौतिक सुरक्षा प्रदान करतात.

Advertisement
Tags :

.