For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकाक, अरभावीत उत्स्फूर्तपणे मतदान

10:48 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोकाक  अरभावीत उत्स्फूर्तपणे मतदान
Advertisement

हुक्केरी, यमकनमर्डी, यरगट्टीत सकाळच्या सत्रात गर्दी तर दुपारी शुकशुकाट : काही मतदारसंघात पोस्टल मतदान अपयशी ठरल्याची चर्चा

Advertisement

बेळगाव : बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात 30 ते 40 टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी 12 नंतर 4 पर्यंत मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मतदारांनी गर्दी केली. तरुण मतदारांसह वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बेळगाव मतदारसंघातील गोकाक, अरभावी मतदारसंघामध्ये मोठ्या चुरशीने मतदान होताना पाहायला मिळाले. चिकोडी मतदारसंघातील हुक्केरी, हत्तरगी, न्यू वंटमुरी या ठिकाणीदेखील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. न्यू वंटमुरीमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली होती. सखी मतदान केंद्रांवरही गर्दी झाली होती. न्यू वंटमुरी येथील सखी मतदान केंद्र आकर्षकपणे सजविण्यात आले होते. गुलाबी रंगाचा मंडप तसेच गुलाबी रंगाच्या फुग्यांनी मतदान केंद्र सजविण्यात आले होते. यमकनमर्डी येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी 11 पर्यंत 22 टक्के मतदान झाले होते. या मतदान केंद्रावर पुरुष तसेच महिला मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सकाळी या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी भेट दिली. हत्तरगी येथील मतदान केंद्रावर महिलांबरोबरच पुरुषांनीही मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी पहिल्यांदाच काही तरुणींनी मतदानाचा हक्क बजावला. 75 वर्षांचे वृद्ध शंकर केतगळ्ळी यांनी व्हिलचेअरचा आधार घेत मतदान केले.

हुक्केरीतही सकाळच्या सत्रात गर्दी

Advertisement

चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या हुक्केरी येथील मतदान केंद्रामध्ये सकाळच्या सत्रात मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. या मतदान केंद्रावर वृद्धांना ताटकळत थांबावे लागले होते. त्यामुळे वृद्धांसाठी घेण्यात आलेले पोस्टल मतदान अपयशी ठरल्याची चर्चा सुरू होती. 85 वर्षांचे गणपती शिंदे यांना कार्यकर्त्यांनी स्वत: घरातून आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. हुक्केरी येथील मतदान केंद्रामध्ये दुपारी 1 पर्यंत 30 टक्के मतदान झाले होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या अरभावी येथील मतदान केंद्रामध्ये  चुरशीने मतदान झाले. जवळपास 40 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान 1.30 पर्यंत झाले होते. मतदान केंद्रावर दुपारीही गर्दी दिसून आली. काही जणांना उन्हामध्येच थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त केली.

गोकाक येथील मतदान केंद्रामध्ये मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने मतदार मतदान करत होते. मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. महिला तसेच पुरुषांना एकाच रांगेत उभे करण्यात आले होते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. दुपारी 2 पर्यंत 44 टक्के मतदान झाले होते. सायंकाळच्या सत्रात पुन्हा गर्दी झाली. त्यामुळे मागील वेळेपेक्षाही या ठिकाणी मतदान अधिक झाल्याची शक्यता आहे. यरगट्टी येथेही मतदारांनी गर्दी केली होती. या ठिकाणी एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ज्येष्ठ तसेच वृद्ध मतदारांना मदत करण्यासाठी ठाण मांडून होत्या. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मात्र, जे वृद्ध मतदार आहेत त्यांना आपण मदत करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करत असल्याचे त्या विद्यार्थिनींनी सांगितले.

प्रियांका जारकीहोळी सकाळी 11 वाजता यमकनमर्डीत

चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी या आपल्या मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी भेटी देत होत्या. निपाणी, चिकोडी यासह हुक्केरी येथे पहाटेच जावून आले आहे. आता यमकनमर्डी येथे आले असून जनतेचा मला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान अत्यंत शांततेत सुरू आहे. याचबरोबर स्वयंस्फूर्तीने मतदान करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन बहिणींनी पहिल्यांदाच बजावला हक्क

हत्तरगी येथील मतदान केंद्रावर पूजा तेरणी आणि रोहिणी तेरणी या बहिणींनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व असून आम्ही पहिल्यांदाच मतदान करत असल्याने आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.

मी वृद्ध तरीही दुर्लक्ष

हुक्केरी येथील गणपती शिंदे हे 85 वर्षाचे मतदार असून त्यांच्या घरी जावून मतदान करून घेणे गरजेचे होते. त्यांची प्रकृतीही ठीक नाही. तरीदेखील आपल्या घरी कोणीही आले नाही. त्यामुळे मी दुसऱ्याचा आधार घेत मतदानासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.