राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जूनला मतदान
महाराष्ट्र 6, कर्नाटकातील 4 जागा : उत्तरप्रदेशसह 15 राज्यांमध्ये निवडणूक होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान वेगवेगळय़ा तारखांना निवृत्त होणाऱया सदस्यांच्या रिक्त होणाऱया जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले. त्यानुसार 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवृत्त होणाऱया सदस्यांमध्ये केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेस नेते अंबिका सोनी, जयराम रमेश, कपिल सिब्बल आणि बसपा नेते के. सतीशचंद्र मिश्र यांचा समावेश आहे. हे सर्वजण 21 जून ते 1 ऑगस्ट दरम्यान सेवानिवृत्त होत आहेत.
नजीकच्या काळात उत्तरप्रदेशातून सर्वाधिक 11 जागा रिक्त होणार आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू-महाराष्ट्रातून प्रत्येकी 6, बिहारमधून 5, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4 सदस्य निवृत्त होत आहेत. मध्यप्रदेश-ओडिशामधून 3, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, झारखंड आणि हरियाणामधून प्रत्येकी 2 आणि उत्तराखंडमधून एक सदस्य निवृत्त होत आहेत. या एकंदर 57 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
24 मे रोजी अधिसूचना
सर्व जागांसाठी 24 मे रोजी मतदानाची अधिसूचना जारी होणार असून 10 जून रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीसाठी 1 जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 3 जून आहे. सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार मतदान संपल्यानंतर एक तासानंतर मतमोजणी केली जाणार आहे. त्यानुसार 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांपैकी बहुतेकांना जुलैमध्ये होणाऱया राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणे अपेक्षित आहे.
या बडय़ा चेहऱयांचा कार्यकाळही समाप्त
मुख्तार अब्बास नक्वी, गोपाल नारायण सिंग, मिसा भारती, शरद यादव (मृत्यूनंतर रिक्त), रेवती रमण सिंग, सुखराम सिंग, कपिल सिब्बल, सतीशचंद्र मिश्र, संजय सेठ, सुरेंद्र सिंग नागर, अंबिका सोनी, पी चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पीयुष गोयल, जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस (मृत्यूनंतर रिक्त), निर्मला सीतारामन यांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱया 57 सदस्यांमध्ये समावेश आहे.