For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सीलबंद

11:07 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सीलबंद
Advertisement

24 तास सीसीटीव्हीची नजर : तीन टप्प्यात पोलीस बंदोबस्त

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी मंगळवार दि. 7 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरूममध्ये आणण्यात आली. यानंतर बुधवारी सकाळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्ट्राँगरूममध्ये सीलबंद करण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत सीलबंद करण्याची प्रक्रिया पार पडली. मंगळवार दि. 7 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. त्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या 4 हजार 524 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे रात्री उशिरापर्यंत आरपीडी येथील स्ट्राँगरूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आली. रात्री उशिरापासून ते बुधवारी दुपारपर्यंत सदर यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सीलबंद करण्यात आली. यासाठी आरपीडी महाविद्यालयातील 20 खोल्यांमध्ये व्यवस्था केली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था व 24 तास सीसीटीव्ही पॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल पाईंटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पाहणी करून अधिकाऱ्यांकडून अहवाल घेण्यात आला. तर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत सदर यंत्रे सीलबंद करण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक विभागाचे जनरल पर्यवेक्षक उपस्थित होते. स्ट्राँगरूम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तीन टप्प्यातील सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सीआयएसएफची तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक राखीव पोलीस दल, तिसऱ्या टप्प्यात राज्य पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. दि. 4 जून रोजी आरपीडी महाविद्यालय येथे मतमोजणी होणार असून त्या दिवशी सकाळी 7.30 वाजता राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर सील उघडले जाणार आहे.

अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या  आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत सीलबंद करण्यात आली आहेत. दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार असून सकाळी 7.30 वाजता सील उघडले जाणार असून 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तोपर्यंत ही यंत्रे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत.

-जिल्हाधिकारी नितेश पाटील

Advertisement
Advertisement
Tags :

.