For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार लोकसभा मतदारसंघात आज मतदान

10:46 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार लोकसभा मतदारसंघात आज मतदान
Advertisement

पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : 13 उमेदवार रिंगणात

Advertisement

कारवार : कॅनरा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघ मतदानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील अन्य 13 मतदारसंघांसह कारवार लोकसभा मतदारसंघात उद्या मंगळवार दि. 7 रोजी मतदानाद्वारे लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. या मतदारसंघात आजअखेर सतरा वेळा निवडणूक झाली असून उद्या मंगळवारी होणारी अठरावी निवडणूक शांतमय, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आज सोमवारी निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. मतदान केंद्रातील अनेक मतदान केंद्रे आकर्षिकरित्या सजविण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात 74-76 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. यावेळी ही टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले होते. वेगवेगळ्या पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार प्रचाराच्या कार्यात गुंतले असताना जिल्हा प्रशासनाने मतदान जागृती कार्यक्रमाला वाहून घेतले होते. त्यामुळे यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. तत्पूर्वी मतदानाची टक्केवारी किती राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ किंवा घट, जय-पराजय याची बाजू बदलू शकतात. मतदारसंघात उष्णतेच्या लाटेमुळे जीवाची लाहीलाही होत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील जनता सूर्य कोपल्यामुळे हैराण झाली आहे. त्यामुळे विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सत्रात किंवा संध्याकाळच्या वेळेत मतदान करून घ्यावे, असे सांगितले जात आहे.

मतदारसंघात बहुरंगी लढत

Advertisement

कारवार मतदारसंघातून यावेळी 13 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. यापैकी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे 5 तर अपक्ष उमेदवारांची संख्या 8 इतकी आहे. 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हे खरे असले तरी कडवी लढत काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि भाजपचे विश्वेश्वर हेगडे यांच्यामध्ये होत आहे. निरंजन सरदेसाई यांच्या रूपाने महाराष्ट्र एकिकरण समिती पहिल्यांदाच कारवार लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे.

खानापूर तालुक्यातील 5 उमेदवार रिंगणात

कारवार लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्यातील 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, म. ए. समितीचे निरंजन सरदेसाई, कृष्णाजी पाटील (अपक्ष), अविनाश पाटील (अपक्ष), राजशेखर हिंडलगी (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. मतदारसंघातील 16 लाख 41 हजार 156 मतदार, 1 हजार 977 मतदान केंद्रांवर 13 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला उद्या 7 रोजी होणार आहे.

Advertisement
Tags :

.