झारखंड, महाराष्ट्रात मतदान आज
झारखंडमध्ये मतदानाचा द्वितीय टप्पा : सुरक्षाव्यवस्थेसह प्रशासन सज्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया आज बुधवारी पूर्ण होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघात, तर नांदेड या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून झारखंडच्या द्वितीय टप्प्यातील 38 मतदारसंघांमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. झारखंडमधील मतदानाच्या प्रथम टप्प्यात 13 नोव्हेंबरला मतदान झाले होते.
विशेषत: महाराष्ट्रातील मतदानाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आणि काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महाआघाडी यांच्यात तीव्र चुरस होईल अशी अपेक्षा आहे. आजच्या मतदानात माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उबाठा नेते आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आदी महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. महाराष्ट्रात एकंदर 9 कोटी 60 लाखांहून अधिक मतदार आहेत. महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे.
झारखंडमध्ये 38 मतदारसंघात...
झारखंडमध्ये मतदानाच्या प्रथम टप्प्यात 43 मतदारसंघांमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान झाले आहे. मतदानाचे प्रमाण 66.28 प्रतिशत असून ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील याच मतदारसंघांमधील मतदानापेक्षा जवळपास 2 टक्के अधिक आहे. आज बुधवारी द्वितीय टप्प्यातील 38 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. झारखंडमधील निवडणूकही स्वारस्यपूर्ण आहे.
सर्व सज्जता पूर्ण
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ आणि झारखंडमधील द्वितीय टप्प्यातील 38 मतदारसंघांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची पूर्ण सज्जता केली आहे. मतदान अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पोहचले असून आज बुधवारी सकाळी सहा वाजता मतदान प्रक्रियेची प्रारंभिक सज्जता करण्यास प्रारंभ करण्यात येईल. प्रत्यक्ष मतदानाचा प्रारंभ सकाळी सात वाजता होणार असून मतदान महाराष्ट्रात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. तर झारखंडमध्ये ते अनेक मतदारसंघांमध्ये ंसंध्याकाळी पाच वाजेपर्यंत, तर काही मतदारसंघांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदानकेंद्रावर पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून महाराष्ट्र आणि झारखंडमधील नक्षल प्रभावित मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. शांततेत मतदान होईल, अशी आयोगाला अपेक्षा आहे.
आजच ‘एक्झिट पोल’ उघडणार
आज बुधवारी सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून विविध वृत्तवाहिन्या त्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झ्ट़ि पोल) निष्कर्ष प्रसिद्ध करणार आहेत. पावणेदोन महिन्यांपूर्वी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष सपशेल चुकीचे ठरले होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांमध्ये अशी सर्वेक्षणे करणाऱ्या संस्थांचीही कसोटी लागणार आहे. तथापि, खरे चित्र 23 नोव्हेंबरला मतगणनेतच स्पष्ट होणार आहे.