For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू काश्मीरसोबतच हरियाणातही मतदान

06:58 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरसोबतच हरियाणातही मतदान
Advertisement

विधानसभेचे बिगुल वाजले :  4 ऑक्टोबर रोजी निकाल , काश्मीरमध्ये 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमधील 90 मतदारसंघात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तारखांना तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर हरियाणात सर्व 90 जागांसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहेत. दोन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र लांबणीवर पडली आहे.

Advertisement

भारतीय निवडणूक आयोगाने 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेने जम्मू काश्मीरमधील राजकीय वातावरण तापायला सुऊवात होणार आहे. तेथे 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. म्हणजे अवघ्या 14 दिवसांत मतदान होणार आहे. मात्र, परिसीमन दरम्यान राज्यात निश्चित केलेल्या जागांसाठी निवडणुका होणार नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 114 जागा होत्या. परंतु राज्यातील विधानसभा जागांचे परिसीमन झाल्यानंतर केवळ 90 जागांवरच निवडणुका होणार आहेत. 114 जागांपैकी 24 जागा पाकिस्तान-प्रशासित काश्मीरच्या भागांसाठी राखीव असल्यामुळे त्या लढवता येणार नाहीत. साहजिकच निवडणुकीसाठी उपलब्ध जागांची प्रभावी संख्या 90 आहे. राज्याचा विशेष दर्जा संपल्यानंतर प्रथमच जम्मू विभागात 43 आणि काश्मीर विभागात 47 मतदारसंघात विधानसभा निवडणुका होत आहेत.

जम्मू काश्मीरची मतदारयादी 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

जम्मू काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 74 सर्वसाधारण, एससी-7 आणि एसटी-9 आहेत. तसेच एकूण 87.09 लाख मतदार असून त्यामध्ये 44.46 लाख पुरुष आणि 42.62 लाख महिलांचा समावेश आहे. 20.7 लाख तरुण मतदार असून 3.71 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अमरनाथ यात्रा 19 ऑगस्टला संपणार असून अंतिम मतदार यादी 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे.

हरियाणात 27 ऑगस्टला मतदारयादी जाहीर होणार

हरियाणात एकूण 90 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये 73 सर्वसाधारण आणि उर्वरित 17 राखीव आहेत. राज्यात एकूण 2.01 कोटी मतदार असून त्यात 1.06 कोटी पुरुष, 0.95 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. 4.52 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात 40.95 लाख तरुण मतदार आहेत. हरियाणाची अंतिम मतदारयादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. हरियाणात 20 हजार 629 मतदान केंद्रे आहेत.

काश्मीरच्या लोकांना हवाय बदल : राजीव कुमार

अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भारताने जगाला दाखवलेल्या चित्राने जगाला प्रेरणादायी संदेश दिला आहे. ती चमक दीर्घकाळ कायम राहील. जगात कुठेही निवडणुका झाल्या की भारताशी केलेली तुलना आपल्याला आठवण करून देत राहील. आता आमची टीम जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी गेली होती, लोकांमध्ये विलक्षण उत्साह दिसून आला. सर्वजण उत्सुक दिसत होते. जनतेला बदल हवा आहे आणि त्यात सहभागी व्हायचे आहे, अशी आशा व्यक्त करताना निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचे प्रतिपादन निवडणूक आयुक्तांनी केले.

यापूर्वी 10 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये निवडणूक

काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर 2014 मध्ये म्हणजे दहा वर्षांपूर्वी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने राज्य सरकार स्थापन केले. त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे 7 जानेवारी 2016 रोजी निधन झाले. त्यानंतर अल्प कालावधीसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी तेथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जून 2018 मध्ये भाजपने पीडीपीच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली. नोव्हेंबर 2018 मध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्य विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर 20 डिसेंबर 2018 रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक कार्यक्रम

एकूण जागा -90,  बहुमत : 46

टप्पा 1                                  टप्पा 2                            टप्पा 3

मतदारसंघ                          24                                         26                                 40

अधिसूचना                          20 ऑगस्ट                          29 ऑगस्ट                           5 सप्टेंबर

अर्जाची अंतिम मुदत            27 ऑगस्ट                          5 सप्टेंबर                             12 सप्टेंबर

अर्जाची छाननी                    28 ऑगस्ट                          6 सप्टेंबर                             13 सप्टेंबर

अर्ज माघार                         30 ऑगस्ट                           9 सप्टेंबर                             17 सप्टेंबर

मतदानाची तारीख            18 सप्टेंबर                          25 सप्टेंबर                                1 ऑक्टोबर

मतमोजणी/निकाल : शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024

...........................................................................

हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम

एकूण जागा -90,  बहुमत : 46

अधिसूचना - 5 सप्टेंबर

नामांकनाची तारीख - 12 सप्टेंबर

अर्जांची छाननी - 13 सप्टेंबर

अर्ज माघार मुदत - 16 सप्टेंबर

मतदानाची तारीख - 1 ऑक्टोबर

मतमोजणी/निकाल : 4 ऑक्टोबर 2024

Advertisement
Tags :

.