चार जागांसाठी आज होणार मतदान
राज्यसभेसाठी पाच उमेदवार रिंगणात : काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा मिळणे अपेक्षित
बेंगळूर : कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण पाच उमेदवार रिंगणात असून विधानसभेवरील सदस्यबळानुसार चारपैकी तीन जागा काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. तर भाजपचा एक उमेदवार निवडून येईल. भाजपने निजदच्या मदतीने अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एक जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग होणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सत्ताधारी काँग्रेसतर्फे अजय माकन, जी. सी. चंद्रशेखर आणि डॉ. सय्यद नासीर हुसेन तर भाजपतर्फे नारायणसा भांडगे निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि निजदने युतीचा पाचवा उमेदवार म्हणून निजद नेते कुपेंद्र रे•ाr यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत उमेदवाराच्या विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. भाजप-निजद युतीजवळ अतिरिक्त 40 मते आहेत. त्यामुळे युतीचे उमेदवार कुपेंद्र रे•ाr यांना पाच मतांची कमतरता भासत आहे. ही मते मिळविण्यासाठी अपक्ष व दोन-तीन काँग्रेसच्या आमदारांची मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
मतपत्रिका पक्षाच्या एजंटाला दाखविणे सक्तीचे
क्रॉस व्होटींगद्वारे काही आमदारांची मते आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न भाजप-निजद युतीने चालविले आहेत. परंतु, सध्यस्थिती पाहिल्यास काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटींगची शक्यता कमीच आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराला आपण कोणाला मतदान करत आहे, हे पक्षाच्या एजंटाला मतपत्रिका दाखवूनच मतदान करावे लागते. त्यामुळे क्रॉस व्होटींग करणे तितके सोपे नाही. कोणीही क्रॉस व्होटींग केल्यास ते पक्षाच्या एजंटाला समजते. अपक्ष आमदारांना कोणालाही मतपत्रिका न दाखविता मतदान करावे लागते. त्यामुळे युतीचे उमेदवार कुपेंद्र रे•ाr हे जिंकतील की पराभूत होतील, याविषयी कुतूहल आहे.
निवडणुकीसाठी तयारी
आज होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली आहे. विधानसौधच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्र. 104 मध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य विधानसभा सचिवालयाच्या सचिव एम. के. विशालाक्षी या निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदानाची मुभा आहे. सायंकाळी 4 नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतमोजणी सुरू होणार आहे.
काँग्रेस आमदारांना व्हीप...
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आमदारांनी विधानसभेत सक्तीने हजर व्हावे, यासाठी काँग्रेस पक्षाने व्हीप जारी केला आहे. राज्य सरकारचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण यांनी सोमवारी ही माहिती दिली. सर्व आमदारांना व्हीप पाठविला आहे. मंगळवारी सकाळी सर्व आमदार बेंगळुरातील हॉटेलमधून बसने थेट विधानसौधमध्ये येणार असून मतदान करणार आहेत. आम्हाला क्रॉस व्होटिंगची भीती नाही. पक्षाच्या एजंटाला मतपत्रिका दाखवूनच आमदारांना मतदान करावे लागते. त्यामुळे कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार वगळता इतरांना मतदान करणार नाही, असा विश्वास अशोक पट्टण यांनी व्यक्त केला. क्रॉस व्होटिंग केल्यास संबंधीत आमदारांविरुद्ध सभाध्यक्षांकडे तक्रार करून त्यांना अपात्र ठरविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.