नोकर भरतीत भ्रष्टाचार केलेल्यांना मतदारांनी धडा शिकवावा
विरोधी गटाच्या बँक विकास पॅनेलची पत्रकार परिषद : शहरासह मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा
वार्ताहर/नंदगड
खानापूर को-ऑप. बँकेच्या नोकर भरतीत बँकेच्या विकासाचा व शहराच्या आसपासच्या गावातील बेरोजगार युवकांसह जनतेचा विचार न करता लाखो रुपये लाच घेऊन नोकर भरती केली आहे. अशा सत्ताधारी भ्रष्ट संचालकांना खानापूर व बेळगाव तालुक्यातील जनतेने धडा शिकवावा व त्यांना निवडणुकीत पराभूत करून घरी बसवावे, असे आवाहन विरोधी गट बँक विकास पॅनेलच्या उमेदवारांनी खानापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आवाहन केले आहे. यावेळी उमेदवार राजेंद्र चित्रगार म्हणाले, बँकेत नोकर भरती करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. निवड करताना कोण जास्त पैसे देत आहे याचाच विचार करण्यात आल्याने नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. बेळगाव, जांबोटी व गर्लगुंजीसारख्या गरजेच्या ठिकाणी बँकेच्या शाखा काढण्याऐवजी तालुक्यातील बिडी व पारिश्वाड येथे शाखा काढून बँकेला नुकसानीत टाकले आहे.
या शाखांमुळे बँकेला नफा होण्यापेक्षा दर महिन्याला मोठा आर्थिक तोटा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एका भ्रष्टाचारी भाऊच्या विरोधात दुसरा भाऊ निवडणूक लढवतो यामागचे कारणच जनतेने ओळखावे, असाही टोला त्यांनी यावेळी मारला. खानापूरच्या लोकांनी आपली बँक वाचविण्यासाठी आपल्या विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. बँकेचे संचालक शिवाजी पाटील यांना सत्ताधारी संचालकांचे वागणे पटले नसल्याने ते सत्ताधारी पॅनेलला तिलांजली देऊन विरोधी विकास पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत. मला मिळालेल्या वागणुकीमुळे मी विरोधी गटातून निवडणूक लढवित असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
बँकेत फर्निचरचे काम करताना मी स्वत: संचालक असताना सुद्धा व रिझर्व बँकेची परवानगी न घेता फर्निचरचे काम करून लाखो रुपये बँकेला नुकसानीत घातले असल्याचे त्यांनी सांगितले. नोकर भरती करण्यापूर्वी बँकेकडे डिपॉझिट वाढविणे गरजेचे होते. तसेच अनेकांना कर्ज देणे व बँकेची स्थिती मजबूत करणे आवश्यक असताना केवळ पैशांसाठी नोकर भरती करून घेतले असल्याचे मतही शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. शिवाय नोकर भरती करताना आपणाला विश्वासात घेतलेच नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. कामगारांची ग्रॅज्युएटी भरणे अत्यावश्यक असताना हा मुद्दा मात्र मुद्दामहून संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येत नव्हता. एखाद्या व्यक्तीला मोठे कर्ज देताना रिझर्व बँकेच्या नियमानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत विचार विनिमय करणे गरजेचे होते. जेणेकरून त्याचा लाभ स्थानिक दहा, वीस, पन्नास हजाराचे कर्ज मागणाऱ्या लहान कर्जदारांना झाला असता व खानापूरची जनता सुखी व समाधानी झाली असती. जनतेपेक्षा स्वत:चाच विचार त्यांनी केल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.
राज्यस्तरापर्यंत विकास होणे अत्यंत गरजेचे
उमेदवार संतोष हंजी म्हणाले, खानापूर बँक ही केवळ जिल्हा मर्यादित नसून तिचा आतापर्यंत राज्यस्तरापर्यंत विकास होणे अत्यंत गरजेचे होते ते करण्यासाठीच आपण निवडणुकीत सहभाग घेतला असल्याचे सांगितले. यावेळी विकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना मते देऊन विजयी करण्याचे आवाहन उमेदवार सीताराम बेडरे व मारुती खानापुरी यांनी केले.