सत्याच्या विजयासाठी मतदारांनी विकास पॅनेलला पाठिंबा द्यावा
उमेदवार बाळाराम शेलार यांचे आवाहन : असत्याविरुद्ध सत्याची लढाई
वार्ताहर/नंदगड
खानापूर को-ऑप. बँकेची निवडणूक ही शेलार विरुद्ध शेलार अशी नसून सत्य विरुद्ध असत्य अशी आहे. बँकेच्या विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलच्या विरोधात आमची लढाई आहे. तेथील गैरव्यवहाराविरोधात आम्ही मैदानात उतरलो आहोत. लोकभावनेचा आदर करून सभासदांना न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा दावा उमेदवार बाळाराम शेलार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला. बाळाराम शेलार हे बँक विकास पॅनेलमधून तर त्यांचे सख्खे भाऊ व विद्यमान चेअरमन अमृत शेलार हे सहकार पॅनेलमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक शेलार विरुद्ध शेलार अशी असल्याची चर्चा रंगली आहे. त्या चर्चेला छेद देत बाळाराम शेलार यांनी आपली लढाई विद्यमान संचालकांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.
संचालकांनी चालविलेल्या गैरव्यवहारामुळे केवळ शेलार कुटुंबीयांना दोषी ठरविले जात असल्यानेच आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. बँकेतील गैरकारभारावर आळा घालायचा आहे. विद्यमान संचालक मंडळाने आवश्यकता नसताना 10 कारकून आणि 5 शिपाई भरतीची जाहिरात काढली. त्यासाठी जवळपास चारशेहून अधिक अर्ज आले असताना ज्या खेड्यांनी बँकेच्या स्थापनेत योगदान दिले. तेथील अर्जदारांना डावलून अन्य भागातील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका ज्येष्ठ संचालकाने तर त्यांच्या पुतण्याची क्लार्क म्हणून बँकेत वर्णी लावली आहे. एकंदर ही नोकरभरती बेकायदा असून सर्व संचालकांनी यात हात ओले करून घेतले आहेत. मात्र यात केवळ ‘शेलार‘ टार्गेट केले जात आहेत. याबाबत विद्यमान सर्व संचालकांना वेळोवेळी विचारणा केली पण सर्वांनी तोंडावर बोट ठेवले. ज्येष्ठ संचालक शिवाजी पाटील, मारुती खानापुरी, दिवंगत शिवाप्पा पाटील यांचे चिरंजीव राजकुमार पाटील यांनी मला नोकर भरतीमागील ‘रहस्य’ सांगितले.
आमचा लढा भ्रष्टाचाराविरोधात
आमचे वडील दिवंगत महादेव शेलार यांनी अनेक वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी कधीही त्यांच्या चारित्र्याला डाग लागू दिला नव्हता. ते नेहमीच न्यायाची बाजू घेत कार्यरत राहिले. पण, गेल्या कांही वर्षांपासून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. परिणामी, मी आणि आम्ही शेलार कुटुंबीयांनी प्रचंड मानसिक त्रास सहन केला. त्यामुळेच या विद्यमान संचालकांना धडा शिकविण्यासाठी आम्ही बँक विकास पॅनेल केले आहे. आमचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला सभासद मतदार न्याय देऊन विजयी करणार, असा विश्वास बाळाराम शेलार यांनी व्यक्त केला आहे.
नियम धाब्यावर बसवून मनमानी
बँकेची स्थापना 1921 मध्ये झाली. बँकेची स्थापना करण्यामध्ये खानापूर शहरासह करंबळ, जळगे, रुमेवाडी, मणतुर्गा, हारुरी, शेडेगाळी, कुप्पटगिरी, बरगाव, रामगुरवाडी, नागुर्डा, मोदेकोप, दोड्डहोसूर या खेड्यांचे फार मोठे योगदान आहे. तत्कालीन संस्थापक व संचालकांनी त्यावेळच्या नोकरभरतीमध्ये शहराबरोबर परिसरातील खेड्यातील शिकलेल्या युवकांना सामावून घेतले. बँकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि बँक नावारूपाला आणली. परंतु विद्यमान संचालक मंडळाने सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून वरील खेड्यातील (कुप्पट्टगिरी वगळता) उच्च शिक्षित युवकांवरती मोठा अन्याय केलेला आहे. ही भरती पैशांची बोली लावून करण्यात आली आहे, असा आरोपदेखील बाळाराम शेलार यांनी केला आहे. विद्यमान संचालकांनी मनमानी कारभार करून कर्जदारांसह सभासदांची पिळवणूक केली आहे. केवळ नोकर भरतीच नव्हे तर बँकेचे व्यवहारही संशयास्पद आहेत. मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा संशय आम्हाला आहे, असे मतही बाळाराम शेलार यांनी व्यक्त केले.