मतदारांनी चांगला पाठिंबा दिला
उत्पल पर्रीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
पणजी : पणजीच्या मतदारांनी चांगला पाठिंबा दिला तथापि अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. आपल्या गटाचे 10 पेक्षा जास्त उमेदवार जिंकतील, असा अंदाज होता पण तसे घडले नाही. या निकालाचे मूल्यमापन करुन आम्ही पुढे जाणार आहोत आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीतही शर्यतीत राहणार आहोत, असे निवेदन ‘आम्ही पणजीकर’ गटाचे नेते उत्पल पर्रीकर यांनी केले. पणजीत काल शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पणजी मनपा निवडणुकीतील पराभवाची थोडक्यात मिमांसा केली. ते म्हणाले की, प्रभाग पुनर्रचना, राखीवता आणि 15 दिवसांचा मिळालेला प्रचाराचा कमी कालावधी याचा काही प्रमाणात परिणाम झाला.
आपल्या गटाचे चार उमेदवार 50 पेक्षा कमी मतांनी तर 6 उमेदवार 100 पेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आपणास 6000 च्या आसपास मते मिळाली होती. साधारणपणे तेवढीच मते आपल्या गटास (एकत्रित) प्राप्त झाली आहेत. आमचे काही उमेदवार नवीन होते, तर काही उमेदवारांना पुनर्रचना, राखीवता यामुळे प्रभाग बदलावे लागले याचा फटका बसून उमेदवारांच्या मतांवर परिणाम झाल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. आपल्या गटास पाठिंबा दिलेल्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. पणजी शहरासाठीचे कार्य चालूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.