Ratnagiri News : मतदारांकडून मिळतोय विजयाचा विश्वास - दिनेश जैतापकर
दिनेश शांताराम जैतापकर जुवाठी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतून निवडणूक लढवणार
राजापूर : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे तत्व नजरेसमोर ठेवून जनसामान्यांच्या सेवेसाठी आणि या विभागाच्या विकासासाठी जुवाठी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण निवडणूक लढवित असल्याचे उमेदवार दिनेश शांताराम जैतापकर यांनी सांगितले.
यापूर्वी देखील जि. प. सदस्य म्हणून काम करताना जनतेने जसा विश्वास दाखविला होता तसाच विश्वास यावेळी देखील मतदारांकडून मिळत असल्याचे जैतापकर यांनी सांगितले. एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक आणि राजकारणी अशी चढत्या क्रमाने यशस्वी वाटचाल करत असतानाच आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेचा विसर मात्र जैतापकर यांनी कधीही होवू दिलेला नाही. स्वत: हलाखीची परिस्थिती अनुभवलेली असल्याने इतरांना होणा-या यातनांची त्यांना आपसूकच जाणीव होते आणि अशा गरजवंतांकरीता जैतापकर यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. समाजकार्याला राजकारणाची जोड मिळाल्यास अधिक प्रभावीपणे समाजकार्य करता येईल या भावनेतून जैतापकर राजकारणात कार्यरत आहेत.
शिवसेनेत उद्भवलेल्या संघर्षानंतर नवी वाट न चोखाळता त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निष्ठा दाखविली होती. त्यामुळे त्यांच्यावर तालुका संपर्कप्रमुख पदासारख्या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर पक्ष संघटना वाढविण्यासाठी जैतापकर यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान यापूर्वी जि. प. सदस्य म्हणून काम करताना मिळणा-या फंडाच्या माध्यमातून केळवली विभागात त्यांनी विकासाची गंगा आणली आहे. या विभागात कोट्यवधीची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. सरकारी कामे दफ्तर दिरंगाईत अडकतात. पैसा उपलब्ध होत नाही, अशावेळी स्वत पुढाकार घेऊन स्वखर्चाने छोटी छोटी कामे मार्गी लावण्यावर जैतापकरांनी भर दिला.
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत अत्यंत तळमळीने विरोधाची भूमिका मांडत नाणार परिसरातील जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. जैतापकर यांच्या संघटन कौशल्यामुळेच नाणार परिसरात संघटना बांधण्यात शिवसेनेला यश आले. जैतापकर यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आपला ठसा समाजमनावर उमटवला आहे. आरोग्य शिबीरे, वह्या वाटप, क्रीडा स्पर्धा हे उपक्रम नियमितपणे राबवत असतात. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा भारही ते उचलत आहेत. आता पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी आणि या प्रभागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे जैतापकर सांगतात.