महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झारखंडमध्ये 70 टक्क्यांपर्यंत मतदान

06:55 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

43 मतदारसंघांमधील मतदारांमध्ये मोठा उत्साह : अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था / रांची

Advertisement

झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक मतदानाच्या प्रथम टप्प्यात 15 जिल्ह्यांमधील 43 मतदारसंघांमध्ये सरासरी 70 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी आज गुरुवारी घोषित होण्याची शक्यता असून टक्केवारी वाढण्याचाही संभव आहे. बुधवारी सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. मतदानाचा कालावधी बहुतेक मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 5 असा होता. काही मतदानकेंद्रांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी 4 पर्यंत मतदानाची वेळ होती. किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र अत्यंत शांततेत मतदान पार पडले. मतदानाचा द्वितीय आणि अंतिम टप्पा 20 नोव्हेंबरला असून त्यात उर्वरित 38 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

झारखंडमधील मतदानाप्रमाणेच केरळमधील वायनाड हा लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांमधील 31 विधानसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदारसंघांमध्ये कर्नाटकातील 3 मतदारसंघांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे.

दुपारी 3 पर्यंत 59 टक्के

झारखंडच्या 43 मतदारसंघांमध्ये दुपारी 3 पर्यंतच सरासरी 59.28 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान सराईखेला-खससावन मतदारसंघात झाले असून ते 70 टक्क्यांहून अधिक आहे. या मतदारसंघात नुकतेच झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेले वनवासी नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन निवडणुकीच्या संघर्षात आहेत. राजधानी रांचीमध्ये सर्वात कमी मतदान झाले असून ते 65 टक्के इतके आहे, अशी माहिती देण्यात आली.

सकाळपासूनच रांगा

झारखंडमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच अनेक मतदानकेंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. त्यांच्या लांबचलांब रांगा दिसून येत होत्या. दुपारी उन्हाच्या वेळीही मतदानाचा उत्साह कमी झाला नव्हता. संध्याकाळी 5 वाजता मतदानाचा कालावधी संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या असल्याने मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता आहे. विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले आहे. या मतदानातून 43 मतदारसंघांमधील 683 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

वायनाडमध्येही उत्साह

केरळच्या वायनाड मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. येथे काँग्रेसच्यावतीने प्रियांका गांधी मैदानात आहेत. या मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.79 टक्के मतदानाची नोंद झाली होती. येथेही 65 ते 67  टक्क्यांपर्यंत मतदान जाण्याची शक्यता आहे. केरळमध्ये एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तेथे 70 टक्के मतदान झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 1 ठार

पश्चिम बंगालमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 70 टक्के मतदानाची नोंद झाली. 24 परगाणा जिल्ह्यातील नैहाती मतदारसंघाच्या जगतदाल येथे तृणमूल काँग्रेसचा नेता अशोक साव याचा गोळीबारामुळे मृत्यू झाला. साव याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार होत असताना त्याचा मृत्यू झाला. राज्यात आणखी काही ठिकाणी हिंसाचार झाला असून काही लोक जखमी झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने नैहाती घटनेचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. सुरक्षा व्यवस्था कठोर असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

आसाममध्ये 70 टक्के

आसाममध्ये 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले असून 70 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा अधिकार उपयोगात आणला आहे. आसामप्रमाणे बिहारमध्ये चार मतदारसंघांमध्ये विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. तेथे संध्याकाळी 5 पर्यंत 55 टक्के सरासरी मतदान झाले होते. मध्यप्रदेशमध्ये 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांसाठी सरासरी 68 टक्के मतदानाची नोंद झाली. छत्तीसगड, मेघालय आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रत्येकी एका मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article