रस्त्याच्या दूरवस्थेवरून मतदारराजाची बॅनरमधून खरमरीत टीका
तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे रस्त्यावरून सावनधानतेचा इशारा
वार्ताहर/कुडाळ
कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस-आंदूर्ले पंचक्रोशीतील गावांना जोडणारा तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच वाहनधारकांना सावधतेचा इशारा करण्यासाठी रस्त्याच्या नजीक अज्ञातांकडून "सावधान" असा बॅनर लावण्यात आला. बॅनरवरमधील मजकुराने प्रशासन व लोकप्रतिनिधींवर असलेल्या नाराजीवर स्पष्ट प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून खरमरीत टीका व आरोप करण्यात आले आहेत. बॅनरवर रस्त्याच्या दुरावस्थेबाबतची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या एकंदर दुरावस्थेबाबत चित्र स्पष्ट करणारा बॅनर लावल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.या बॅनरवर असा मजकूर लिहिण्यात आला आहे की, कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस-आंदूर्ले पंचक्रोशीतील गावांना जोडणारा तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही. वाहन चालकांनी वाहने चालविताना सांभाळून चालवावीत. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. गेली वीस वर्षे या रस्त्याचे काम रखडलेले आहे. निवडणूक जवळ आली की सर्वजण आश्वासने देऊन जातात. परंतू निवडणूक झाल्यानंतर कोणीही रस्त्याच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत. ग्रामस्थांनी वारंवार प्रस्ताव देऊनही याकडे दुर्लक्ष केला जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे येणाऱ्या निवडणूकांना मतदान करायचे की नाही हा प्रश्न आहे. हा रस्ता एका वाडी पुरता नसून तो कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला तसेच दुसऱ्या बाजूने केळूस, आंदूर्ले अशा पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ता आहे. रस्ता खराब असल्याने बस वाहतूक बंद आहे. त्यामुळे शाळेतील मुलांची गैरसोय होते. रोज या रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले आहे.निवडून आलेले प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. लवकरात-लवकर रस्त्याच्या मागणीकडे लक्ष देवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. येत्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे वाहून जाणार आहे. त्यामुळे वाहधारकांना अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देवून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी बॅनर च्या माध्यमातून करण्यात आली आहे.