लग्न-सोहळ्यातील उधळपट्टीवर विशेष विधेयकाची मात्रा
फक्त 50 बाराती, 10 प्रकारचे पदार्थ! : काँग्रेस खासदाराने संसदेत सुचविले अनेक प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या एका खासदाराने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक विधेयक मांडले आहे. या विधेयकामध्ये विवाह सोहळ्यामध्ये होणाऱ्या अवाढव्य खर्चावर आळा घालण्याची सूचना करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडलेल्या खासगी सदस्य विधेयकानुसार, वरातीमध्ये केवळ 50 लोकांनाच सहभागी होता येणार आहे. तसेच, या अंतर्गत, लग्नात 10 पेक्षा जास्त पदार्थ दिले जाऊ शकत नाहीत. याशिवाय 2,500 ऊपयांपेक्षा जास्त रक्कम आहेर किंवा भेट म्हणून देता येणार नाही, अशीही तरतूद आहे. पंजाबच्या खडूर साहिबच्या खासदाराने वधूच्या कुटुंबावर आर्थिक भार टाकणाऱ्या भव्यदिव्य विवाहांचा दिखाऊपणा संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी 4 ऑगस्ट रोजी लोकसभेत ‘विशेष प्रसंगांवर उधळपट्टी प्रतिबंधक विधेयक 2020’ सादर केले. यावेळी त्यांनी “वंचित आणि निराधारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने लग्न आणि सण यांसारख्या विशेष प्रसंगी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. विधेयकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे ‘शगुन’ किंवा विशेष प्रसंगी देवाणघेवाण केलेल्या भेटवस्तूंचे मौद्रिक मूल्य 2,500 ऊपयांपेक्षा जास्त नसावे, असेही सुचविले आहे.
विवाहासारख्या मोठ्या सोहळ्यांमध्ये लोक आपली मालमत्ता विकतात किंवा अवाजवी खर्च करताना बँकेचे कर्जही काढतात. यावर आळा बसावा या उद्देशाने पंजाबच्या खडूर साहिबच्या खासदाराने यासंबंधीचे विधेयक मांडले आहे. विवाहसोहळ्यांवरील अनावश्यक खर्चावर बंदी घालून, कायद्याने स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची आणि मुलींकडे ‘ओझे’ म्हणून पाहण्याची धारणा बदलण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांना 2019 मध्ये फगवाडा येथे एका लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर या विधेयकाची प्रेरणा मिळाली. एका सोहळ्यातील भोजनावेळी अन्नपदार्थांची झालेली नासाडी पाहून त्यांनी हे विधेयक मांडले आहे. खासदार गिल यांनी ही तत्त्वे आपल्या कुटुंबात लागू करून त्यांनी वैयक्तिक बांधिलकी व्यक्त केली. यावषी आपल्या मुलाचे आणि मुलीचे लग्न लावताना त्यांनी केवळ 30 ते 40 पाहुण्यांनाच आमंत्रित केले होते.