For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 मानांकनात व्हॉल, अॅमेलिया केर अग्रस्थानी

06:12 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 मानांकनात व्हॉल  अॅमेलिया केर अग्रस्थानी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकनात ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज जॉर्जिया व्हॉल तर गोलंदाजांच्या मानांकनात न्यूझीलंडची अॅमेलिया केर यांनी अग्रस्थान मिळविले आहे.

आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तीन महिन्यांच्या कालावधीवर आली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या जलद क्रीडाप्रकारात ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया व्हॉल तसेच न्यूझीलंडची अॅमेलिया केर यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत ताज्या मानांकन यादीत अग्रस्थानावर झेप घेतली आहे. व्हॉल आणि अॅमेलिया केर या दोन युवा महिला खेळाडूंनी टी-20 हा क्रिकेटचा प्रकार अधिक आकर्षित केला आहे.

Advertisement

टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने अग्रस्थान मिळविले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया व्हॉलने विंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात जलद शतक झळकविल्याने तिने मानांकनात मुनीला मागे टाकत अग्रस्थान काबीज केले. या मालिकेतील सेंट व्हिनसेंट येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात व्हॉलने केवळ 53 चेंडूत 101 धावा झोडपल्या. टी-20 आणि वनडे या प्रकारामध्ये जलद शतक झळकविणारी व्हॉल ही चौथ्या क्रमांकाची युवा खेळाडू आहे. तिने हा पराक्रम आपल्या वयाच्या 22 वर्षे आणि 230 दिवसाची असताना केला. या कामगिरीमुळे व्हॉलने फलंदाजांच्या मानांकन यादीत आठव्या स्थानावररून पहिल्या स्थानावर झेप घेतली.

न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार अॅमेलिया केरने द. आफ्रिकाविरुद्ध अलिकडेच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत फलंदाजीत 276 धावा झळकविल्या तर गोलंदाजीत तिने 5 गडी बाद केले. यापूर्वी गोलंदाजांच्या मानांकन यादीत विंडीजची हिली मॅथ्यूज पहिल्या स्थानावर होती. तसेच न्यूझीलंडच्या अॅमेलिया केरने टी-20 प्रकारातील अष्टपैलूंच्या मानांकन यादीत ऑक्टोबर 2023 पासून अग्रस्थान कायम राखले आहे. गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पाकची फिरकी गोलंदाज सादीया इक्बाल दुसऱ्या स्थानावर आहे. अॅमेलिया केर आणि सादीया इक्बाल यांच्या गुणांमध्ये फारसा फरक नाही. 12 जूनपासून आरसीसीची टी-20 महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळविली जाणार आहे.

आयसीसीच्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोनने पुन्हा अग्रस्थान मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या अलाना किंगला मागे टाकले असून मॅथ्यू चौथ्या तर केर नवव्या स्थानावर आहे. आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची लिचफिल्ड पाचव्या स्थानावर असून न्यूझीलंडची मॅडी ग्रीन 13 व्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.