फोक्सवॅगनची नवी विर्टस बाजारात लाँच
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
फोक्सव्हॅगन कंपनीने अखेर गुरुवारी भारतामध्ये सेडान प्रकारातील विर्टस ही नवी गाडी लाँच केली आहे. सदरच्या गाडीची सुरुवातीची किंमत 11.21 लाख रुपये इतकी असणार असून यातीलच आधुनिक गटातील मोटारीची किंमत 17.91 लाख रुपये असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टायगून आणि स्कोडा स्लाव्हिया यानंतर सदरची चौथी गाडी भारतामध्ये कंपनीकडून उतरविण्यात आली आहे. 1.0 लिटर टीएसआय आणि 1.5 लिटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजीन यांना असणार आहे. वाईल्ड चेरी रेड, कुर्कुमा यलो, रायझिंग ब्लू मेटालिक, रेफलेक्स सिल्व्हर, कार्बन स्टील ग्रे आणि कँडी व्हाईट या रंगांमध्ये सदरची गाडी उपलब्ध केली जाणार आहे.
या असतील सुविधा
यामध्ये सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रिअर पार्किंग कॅमेरा आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यासारख्या सोयीसुविधा असणार आहेत. वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह 10 इंच टचस्क्रीन इन्फॉर्मेट सिस्टीम यात असणार असून 8 स्पीकर साऊंडसिस्टीम, वायरलेस मोबाईल चार्जर, इलेक्ट्रिक सनरुफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि क्रूझ कंट्रोलसारख्या सुविधाही यात असणार आहेत.
कुणाशी स्पर्धा
सदरची गाडी बाजारातील स्लाव्हिया, मारुती सुझुकीची सियाझ, होंडा सिटी, हय़ुंडाई वेर्णा यांच्याशी आगामी काळामध्ये स्पर्धा करणार आहे. यातील होंडा सिटी, हय़ुंडाई वेर्णा या दोन गाडय़ा डिझेल इंजीनसोबत उपलब्ध आहेत.