‘इंडस टॉवर’मधून व्होडाफोन बाहेर पडणार
890 कोटींच्या थकीत कर्जाची परतफेड करण्याच्या योजनेतून व्होडाफोन होणार बाजूला
नवी दिल्ली :
ब्रिटनमधील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन पीएलसीने मोबाईल टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी इंडस टॉवर्समधून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कंपनीतील उर्वरित 3 टक्के हिस्सा 2,800 कोटी रुपयांना विकला आहे. व्होडाफोन पीएलसीने ‘एक्सिलरेटेड बुकबिल्ड ऑफरिंग’द्वारे इंडस टॉवर्समधील उर्वरित 7.92 कोटी समभाग विकले आहेत, असे व्होडाफोनने लंडन स्टॉक एक्सचेंजला सांगितले.
कंपनी गेल्या काही काळापासून इंडस टॉवर्समधील आपला हिस्सा कमी करत होती. गेल्या वर्षी जूनमध्ये, व्होडाफोनने ब्लॉक डीलमध्ये 48.47 कोटी शेअर्स किंवा इंडस टॉवर्समधील 18 टक्के इतका मोठा हिस्सा विकला आणि 15,300 कोटी रुपये उभारले. नवीन करारामुळे व्होडाफोन विद्यमान कर्जदारांना 890 कोटी रुपयांचे थकीत कर्ज फेडण्यास सक्षम होणार असल्याची माहिती आहे.
भारती इन्फ्राटेल आणि इंडस टॉवर्सच्या विलीनीकरणादरम्यान झालेल्या सुरक्षा पॅकेजनुसार, व्होडाफोन पीएलसीचा इंडस टॉवर्समधील 21 टक्के हिस्सा 1.4 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या संदर्भात मुख्य धारणाधिकाराशी जोडला गेला होता. 2019 मध्ये आयडियाच्या राइट्स इश्यूमध्ये भाग घेण्यासाठी कर्जदारांकडून ही रक्कम घेतली होती.
आता, सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत व्होडाफोनचे इंडसवरील दायित्व पूर्णपणे संपले आहे. शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये इंडस टॉवर्सचे शेअर्स 3.22 टक्क्यांनी घसरून 320.15 रुपयांवर आले. व्होडाफोन पीएलसी नवीन व्यवहारातून उरलेल्या 1,910 कोटी रुपयांचा वापर टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडिया (व्हीआय) मधील हिस्सा वाढवण्यासाठी करेल.