व्होडाफोन आयडिया लवकरच 5-जी लाँच करणार
नोकिया-एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 30 हजार कोटींचा करार : 4-जीचा विस्तारही करणार
मुंबई :
व्होडाफोन आयडियाने तीन वर्षात 4 जी आणि 5 जी नेटवर्क उपकरणांच्या पुरवठ्यासाठी नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. कंपनीच्या 6.6 अब्ज डॉलर (रु. 55 हजार कोटी) तीन वर्षांच्या कॅपेक्स योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. कंपनीच्या योजनेचे उद्दिष्ट 4 जी ग्राहकसंख्या 1.03 अब्ज (103 कोटी) वरून 1.2 अब्ज (120 कोटी) पर्यंत वाढवणे, प्रमुख बाजारपेठांमध्ये 5जी लाँच करणे आणि डेटा वाढीच्या अंतर्गत क्षमता वाढवणे आहे.
आम्ही वाढीच्या प्रवासात आहोत: सीईओ अक्षय मुंदरा
व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ अक्षय मुंदरा म्हणाले, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचा अनुभव देण्यासाठी उदयोन्मुख नेटवर्क तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही गुंतवणुकीचे चक्र सुरू केले आहे. आम्ही आमच्या व्हीआयएल 2.0 च्या प्रवासावर आहोत आणि येथून व्हीआयएल उद्योग वाढीच्या संधींमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यरत होणार आहोत.
नोकिया आणि एरिक्सन हे आमच्या स्थापनेपासून आमचे भागीदार आहेत आणि त्या भागीदारीतील हा आणखी एक मैलाचा दगड आहे. सॅमसंगसोबत आमची नवीन भागीदारी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही 5 जी युगात पुढे जात असताना आमच्या सर्व भागीदारांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.’
समभाग शुक्रवारी 1.35 टक्क्यांनी वाढले
व्होडाफोन-आयडियाचा समभाग शुक्रवारी 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 10.52 रुपयांवर बंद झाला. यासह या कंपनीचे बाजारमूल्य 73 हजार कोटी रुपये झाले आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 35 टक्के आणि सहा महिन्यांत 20 टक्क्यांनी घसरले आहेत.