व्होडाफोन आयडियाचे समभाग 18 टक्क्यांनी मजबूत
52 आठवड्यांनी उच्चांक केला प्राप्त
वृत्तसंस्था/ मुंबई
टेलीकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या समभागाने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये 18 टक्क्यांहून अधिक उसळी घेऊन 52 आठवड्यांनंतर नवा उच्चांक गाठला.
व्होडाफोन आयडियाचा समभाग बीएसईवर 17.37 टक्क्यांनी वाढून 15.54 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सची शुक्रवारी 84 कोटी रुपयांची खरेदी-विक्री झाली. व्होडाफोन आयडियाच्या समभागांनी गेल्या तीन महिन्यात 30 टक्के आणि वर्षभरात 94 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. 2007 मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून 2023 हे वर्ष समभागासाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे.
समभाग वाढण्याचे कारण?
व्होडाफोन आयडियाच्या शेअरच्या किमतीत नुकतीच झालेली वाढ कंपनीच्या प्रवर्तकांच्या इक्विटी गुंतवणुकीच्या चर्चेदरम्यान आली आहे. व्यवस्थापन 5 जी रोलआउटसाठी विक्रेत्यांशी देखील चर्चा करत आहे. दूरसंचार ऑपरेटर आपली कर्जेही कमी करत आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये दूरसंचार विभागाला 1,701 कोटी रुपये दिले होते. दुपारी 2:30 वाजता व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 18.35 टक्क्यांनी किंवा 2.43 रुपयांनी वाढत 15.67 रुपयांवर व्यवहार करत होते.