ब्लादिमीर पुतीन येणार भारत दौऱ्यावर
ब्रिक्स शिखर परिषदेत घेणार भाग : वर्षभरात भारताचा दुसरा दौरा ठरणार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. ही परिषद 12-13 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. पुतीन यांच्या दौऱ्याची क्रेमलिनने मंगळवारी पुष्टी दिली. एक वर्षाच्या आत पुतीन यांचा हा दुसरा भारत दौरा ठरणार आहे. यापूर्वी पुतीन हे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 23 व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सामील होण्यासाठी भारतात पोहोचले होते.
चालू महिन्याच्या प्रारंभी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव हे ब्रिक्स देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आले होते. तर ब्रिक्सच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद मागील वर्षी जुलै महिन्यात ब्राझीलच्या रियो डि जनेरियो या शहरात पार पडली होती. ब्राझीलमध्ये ही 17 वी शिखर परिषद आयोजित झाली होती.
भारतासाठी रशिया महत्त्वपूर्ण
भारताचे रशियासोबतचे संबंध विदेश धोरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खासकरून मागील अनेक दशकांमध्ये दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य आणि ऊर्जा संबंध अत्यंत घनिष्ठ राहिले आहेत. भारत अद्याप रशियाला स्वत:च्या दीर्घकालीन रणनीतिक हितांच्या सुरक्षेकरता महत्त्वाचा सहकारी मानतो. रशिया भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. भारतीय सशस्त्र दलांच्या सैन्य हार्डवेअरचा एक मोठा हिस रशियन बनावटीचा आहे. यात एस-400 हवाई सुरक्षा प्रणाली, सुखोई लढाऊ विमान, संयुक्त स्वरुपात विकसित ब्राह्मोस क्षेपणास्त्र सामील आहे.
ब्रिक्स प्रभावशाली संघटना
ब्रिक्स एक प्रभावशाली जागतिक संघटना असून याची स्थापना मूळ स्वरुपात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने मिळून केली होती. याचा उद्देश पाश्चिमात्य देशाच्या पारंपरिक भू-राजकीय आणि आर्थिक प्रभुत्वाला आव्हान देणे होता. ही संघटना जागतिक लोकसंख्या आणि जागतिक जीडीपीच्या एका विशाल हिस्स्याचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेचे लक्ष आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालींमध्ये सुधार करणे आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांदरम्यान आर्थिक सहकार्य वाढविण्यावर केंद्रीत आहे.