मंगोलियात पोहोचले ब्लादिमीर पुतीन
अटकेऐवजी मिळाला गार्ड ऑफ ऑनर : चंगेज खानच्या स्मारकावर रशियन झेंडा
वृत्तसंस्था/ उलनबटार
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे सोमवारी रात्री दोन दिवसांच्या दौऱ्यानिमित्त मंगोलियात पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगोलिया सरकारला पुतीन यांना अटक करण्याचा आदेश दिला होता, परंतु पुतीन यांना तेथे गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला धुडकावत राजधानी उलनबटारमध्ये पुतीन यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यादरम्यान चंगेज खानच्या स्मारकाला मंगोलिया आणि रशियाच्या झेंड्यांनी सजविण्यात आले होते.
पुतीन यांच्या आगमनानंतर काही मानवाधिकार समर्थकांनी विमानतळाबाहेर निदर्शने केली आहेत. तर दुसरीकडे मंगोलियाच्या विदेशमंत्री बतमुंख बत्त्सेत्सेग या स्वत: पुतीन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचल्या होत्या. पुतीन यांनी मंगळवारी मंगोलियाचे राष्ट्रपती उखना खुरेलसुख यांची भेट घेतली आहे. 1939 मध्ये सोव्हियत आणि मंगोल सैनिकांनी जपानच्या सैन्यावर मिळविलेल्या विजयाला 85 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमात दोन्ही नेते सामील झाले.
मंगोलिया हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा (आयसीसी) सदस्य देश आहे. आयसीसीने मार्च 2023 मध्ये पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पुतीन यांना युक्रेनमध्ये मुलांचे अपहरण आणि प्रत्यार्पणाच्या आरोपांवरून युद्धगुन्ह्यांसाठी जबाबादर ठरविण्यात आले आहे. आयसीसीने मंगोलिया सरकारला पुतीन यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. वॉरंट जारी झाल्यापासून आतापर्यंत पुतीन यांनी 12 देशांचा दौरा केला असून यात चीन, उत्तर कोरिया, सौदी अरेबिया आणि युएई यासारखे देश सामील आहेत.
रशियावर निर्भर मंगोलिया
मंगोलिया हा देश रशियावर बऱ्याचअंशी निर्भर आहे. तर दुसरीकडे आयसीसीकडे कुणालाही अटक करण्याची शक्ती नाही. तर स्वत:च्या आदेशाचे पालन करण्यासाठी आयसीसी स्वत:च्या सदस्य देशांवर निर्भर आहे. भारत, चीन, तुर्किये, रशिया समवेत अनेक मोठे देश आयसीसीचे सदस्य नाहीत. मंगोलिया हा देश रशिया आणि चीनदरम्यान स्थित आहे. दोन्ही देशांसोबत मंगोलियाचे चांगले संबंध आहेत. मंगोलिया हा कच्चे तेल तसेच विजेसाठी रशियावर तर उर्वरित गोष्टींसाठी चीनवर निर्भर आहे. मंगोलिया रशिया-युक्रेन युद्धाप्रकरणी तटस्थ आहे. मंगोलियाने दोन्हीपैकी कुठल्याही देशाची बाजू घेतलेली नाही.
मंगोलियाला याची शिक्षा मिळेल
युक्रेनने पुतीन यांच्या मंगोलिया दौऱ्यावर टीका केली आहे. मंगोलियाने पुन्हा एकदा गुन्हेगाराला वाचण्याची संधी दिली आहे. मंगोलियाला याची किंमत मोजावी लागणार आहे. युक्रेन सहकारी देशांसोबत मिळून मंगोलियाला याची शिक्षा देईल असे युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.