विवेकानंदांचे विचार, आचरण आजही प्रेरणादायी!
पद्मश्री निवेदिता भिडे यांचे प्रतिपादन : कोसंबी विचार महोत्सवात गुंफले चौथे पुष्प
पणजी : स्वामी विवेकानंद यांचे विचार आचरण, तत्त्वे आजच्या युगातही प्रेरणादायी असून त्याचे पालन केल्यास आपण सर्वजण समाज, देश, राष्ट्र आणि जगात बदल घडवून आणू शकतो, असा आत्मविश्वास कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती व अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री निवेदिता भिडे यांनी व्यक्त केला. ‘स्वामी विवेकानंदांचा संदेश’ हा त्यांचा विषय होता. राजधानी पणजीतील कला अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात चौथे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. त्यांनी पुढे सांगितले की, युवा पिढीवर विवेकानंदांचा जास्त विश्वास होता आणि ती पिढी जास्त काहीतरी करू शकेल म्हणून स्वामींनी युवक, युवतींना हाक दिली होती. त्याचा परिणाम होऊन अनेकांनी पुढाकार घेऊन समाजासाठी, देशासाठी सेवा म्हणून योगदान दिले.
‘माय सिस्टर्स अॅन्ड ब्रदर्स’
अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत बाकीच्या वक्त्यांनी उपस्थितांचा ‘लेडीज अॅन्ड जंटलमन’ असा उल्लेख केला तर विवेकानंदानी ‘माय सिस्टर्स अॅन्ड ब्रदर्स’ अशी हाक मारली तेव्हाच हा साधासुधा माणूस नाही हे अधोरेखित झाले होते. वरील हाकेने विवेकानंदांनी परिषदेतील वक्ते, श्रोते यांच्यासह जगातील जनतेची मने जिंकली, याकडे भिडे यांनी लक्ष वेधले.
युवक-युवतींना आवाहन
विवेकानंदाचे तत्त्वज्ञान फार मोठे होते. अमेरिकेतील भाषणानंतर त्याचे महत्त्व भारत देशासह जगाला पटले आणि त्यांना विविध ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले तसेच उपनिषदे, गीता यांचाही अभ्यास केला. देशभर किंवा जगात इतरत्र फिरताना त्यांनी समाज अगदी जवळून पाहिला. समाजातील विषमता त्यांना दिसून आली आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी समाजातील युवा पिढीला आवाहन केले.
बदलाची सुरूवात स्वत:पासून करा
बदलाची सुरूवात प्रथम स्वत:पासून करा, तरच समाजाचे, देशाचे, जगाचे पुननिर्माण होईल असे ते सांगायचे. फक्त स्वत:साठी नव्हे तर देशासाठी, समाजासाठी काहीतरी करा, तेच तर खरे कर्तव्य आहे. त्याची तुलना कशाशी करू नका. ईश्वर सर्वत्र आहे. याचे भान ठेवा. जीवनात रडत बसण्यात काही अर्थ नाही. आपल्या वाट्याला आलेली कामे आनंदाने करावीत. त्यासाठी कुंठत बसू नये, असे आवाहन विवेकानंदांनी केले.
विविधता असली तरी राष्ट्र एक
आपला समाज अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेला आहे असे त्यांना दिसून आले. तेव्हा त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करून त्यांची कार्यवाही करा अशी विवेकानंद यांची शिकवण असल्याचे भिडे यांनी निदर्शनास आणले. ज्यांनी आत्मविश्वास गमावला त्याचा आत्मविश्वास जागवा आणि परत मिळवून देण्यासाठी विवेकानंदांनी आयुष्य वेचले. भारत देशात विविधता असली तरी राष्ट्र एक आहे हे अस्तित्त्व त्यांनी पटवून दिल्याचे भिडे यांनी नमूद केले.
आज होणार समारोप
कला, संस्कृती संचालनालयातर्फे कोसंबी विचार महोत्सव व त्यातील व्याख्याने चालू असून रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या सोमवारी सुरू झालेल्या या महोत्सवाचा समारोप आज शुक्रवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे. नौला अधिकारी आणि जगभर जलसफारीतून भ्रमण केलेले अभिलाष टॉमी यांचे व्याख्यान आज शुक्रवारी होणार आहे. मध्यंतरीच्या काळात काही करणाने बंद पडलेला हा विचार महोत्सव पुन्हा सुरू झाल्याचा आनंद श्रोत्यांमध्ये दिसून येत आहे.