घर बांधून देण्याची आमदार विश्वजीत कदमांची ऑफर विवेकानंद पाटलांनी नम्रपणे नाकारली
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपल्या मिश्कील आणि अभ्यासपूर्ण भाषणशैलीमुळे चर्चेत आलेले विवेकानंद पाटील सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. ग्रामीण प्रश्नांची जाण, राजकीय संदर्भ आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांच्या भाषणांना मोठी दाद मिळत आहे.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी विवेकानंद पाटील यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा उल्लेख करत, त्यांच्या आई-वडिलांसाठी चांगले घर बांधून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, विवेकानंद पाटील यांनी ही मदत नम्रपणे नाकारली.
‘मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही,’ असे सांगत त्यांनी विश्वजीत कदम यांच्या प्रस्तावाबद्दल आभार मानले. घर आज ना उद्या बांधता येईल; मात्र सध्या आपले करिअर पणाला लावून आंदोलनात उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे आणि दिवंगत पतंगराव कदम यांची उदाहरणे देत संघर्षातून स्वतःचे भविष्य घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘तुम्ही बोललात त्याने मला दहा हत्तींचं बळ मिळालं,’ असेही त्यांनी कदम यांना सांगितले.
मात्र, आपल्या खास मिश्कील शैलीत विवेकानंद पाटील यांनी विषयाला वेगळे वळण दिले. ‘दादा, तुम्ही घर बांधून द्याल; पण उद्या 2029 ला मी लोकसभेचा फॉर्म भरायचा म्हटलं आणि ती जागा चुकून काँग्रेसला सुटली, तर मग तुम्हीच म्हणाल लेका थांब,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यानंतर आमदार विश्वजीत कदम यांनीही मिश्कील प्रतिक्रिया देत ‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारून करायचं आपण,’ असे म्हटले. त्यांच्या या प्रतिक्रियेलाही उपस्थितांनी दाद दिली.
विवेकानंद पाटील यांच्या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेची आणि हजरजबाबीपणाची सध्या आंदोलनस्थळी तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
