Vivek Sangale | विवेक सांगळेचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद; अभिनेत्याला मोठा धक्का
विवेक सांगळेचा व्हिडिओ चर्चेत
‘मुंबई - भाग्य दिले तू मला’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता विवेक सांगळे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो हे अकाउंट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता; मात्र अखेर त्याने नव्या अकाउंटसह पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
विवेकने नुकताच नवीन इंस्टाग्राम अकाउंट सुरू करून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या जुन्या अकाउंटबाबत घडलेली घटना सांगितली. त्याच्या मते, 3 जानेवारी 2026 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचे अकाउंट डिलिट करण्यात आले.
या संदर्भात बोलताना विवेक म्हणाला की, गेल्या दोन महिन्यांपासून अनेक मित्र आणि चाहत्यांचे त्याला फोन व मेसेज येत होते. “इंस्टाग्रामवरून तू अचानक गायब का झालास? सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलास का?” असे प्रश्न अनेक जण विचारत होते. यानंतर त्याने सर्वांना सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.
अकाउंट परत मिळवण्यासाठी त्याने विविध स्तरांवर प्रयत्न केल्याचेही विवेकने सांगितले. तो मेटा प्लॅटफॉरमच्या मुंबईतील बीकेसी ऑफिसमधील टीमशी बोलला, तसेच इन्टाग्रामच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील मेटाच्या टीमलाही अनेक ई-मेल पाठवले. मात्र या प्रयत्नांनंतरही त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
“इतक्या वर्षांच्या मेहनतीवर एका दिवसात पाणी फेरलं गेलं. खूप वाईट वाटलं, पण आता मी पुन्हा नव्याने सुरुवात करतोय,” असेही विवेकने सांगितले.अकाउंट बंद होण्यापूर्वी विवेकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुमारे 1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच्या अनेक रील्सना लाखो आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते. एका व्हिडिओला तर तब्बल 32 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
आजच्या काळात कलाकारांसाठी इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवाद साधण्याचे माध्यम राहिलेले नाही. प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठीही त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर आणि व्यावसायिक संधींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.