ट्रम्प कॅबिनेटमधून विवेक रामास्वामींची माघार
ट्रम्प यांच्या शपथग्रहणानंतर जाहीर केला निर्णय : गव्हर्नर होण्यासाठी मंत्रिपद नाकारले
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी आता अमेरिकेतील डीओजीईचा हिस्सा होणार नाहीत. व्हाइट हाउसने डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या काही तासानंतर रामास्वामी यांनी हे पद सोडल्याची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी रामास्वामी यांना एलन मस्क यांच्यासोबत डीओजीईचे नेतृत्व करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडले होते. परंतु ट्रम्प यांचे निकटवर्तीय 39 वर्षीय रामास्वामी यांनी आता हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामास्वामी हे गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढविण्याची योजना आखत आहेत. विवेक यांनी मागील वर्षी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावा केला होता. परंतु त्यांना यात यश आले नव्हते.
डीओजीईच्या निर्मितीत सहकार्य करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब राहिले. एलन आणि त्यांची टीम भविष्यात याला सुव्यवस्थति करण्यात यशस्वी ठरतील असा मला विश्वास आहे. ओहायोत स्वत:च्या भविष्याच्या योजनांविषयी लवकरच माहिती देणार आहे. आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांच्या अमेरिकेला पुन्हा महान करण्याच्या स्वप्नात पूर्णपणे मदत करण्यासाठी तयार आहे असे उद्गार रामास्वामी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काढले आहेत.
निवडणूक लढविण्यासाठी सोडले पद
शासकीय दक्षता सल्लागार समुहाने एका वक्तव्याद्वारे डीओजीईच्या स्थापनेत रामास्वामी यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. रामास्वामी लवकरच निवडणूक लढविण्याचे उद्दिष्ट बाळगून असून यामुळे त्यांना डीओजीईतून बाहेर रहावे लागणार आहे. आम्ही मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्या योगदानासाठी त्यांचे आभार मानतो आणि अमेरिकेला महान करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा करतो असे समुहाच्या प्रवक्त्या अन्ना केली यांनी म्हटले आहे.
ओहायो गव्हर्नरपदासाठी इच्छुक
रामास्वामी यांचा डीओजीईतून हटण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. रामास्वामी हे ओहायोच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढविण्याची शक्यता पाहता प्रांतातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांची थेट लढत वर्तमान गव्हर्नर माइक डेवाइन यांच्याशी होऊ शकते. रामास्वामी लवकरच ओहायोच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा करू शकतात. ओहायोमध्ये गव्हर्नरपदाची निवडणूक नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. ओहायो हा प्रांत रिपब्लिकन पार्टीसाठी अनुकूल मानला जात असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाल्यास रामास्वामी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी ठरण्याची शक्यता आहे.
भारताशी संबंध
विवेक रामास्वामी यांचे वडिल गणपति रामास्वामी हे केरळचे रहिवासी आणि पेशाने इंजिनियर होते. विवेक यांची आई गीता रामास्वामी यांनी म्हैसूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टीट्यूटमधून शिक्षण घेतले होते. 1970 च्या दशकात विवेक यांचे आईवडिल केरळमध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. अमेरिकेच्या ओहायोमध्ये ऑगस्ट 1985 मध्ये विवेक रामास्वामी यांचा जन्म झाला होता. त्यांनी जेसुइट हायस्कूलमधून वेलेडिक्टोरियनच्या स्वरुपात ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर त्यांनी बिझनेस आणि राजकारणात पाऊल ठेवले होते. विवेक रामास्वामी हे अमेरिकेतील प्रथितयश उद्योजक असून ते अब्जावधी डॉलर्सची संपत्ती बाळगून आहेत.