विठ्ठल मंदिरे आज गजबजणार
उद्यापासून तुळशी विवाह; बुधवारी लक्ष्मीपूजन
बेळगाव :
कार्तिक एकादशी रविवारी (दि. 2) असून तिला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. या एकादशीनिमित्त शहर परिसरातील विठ्ठल मंदिरांतून अभिषेक, विशेष पूजा, भजन असे कार्यक्रम होणार आहेत. यंदा कार्तिक एकादशी शनिवार (दि. 1) व रविवार (दि. 2) असे दोन दिवस आल्याने विठ्ठल भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. स्मार्त संप्रदायातील भाविकांनी शनिवारी कार्तिक एकादशीचा उपवास केला. मात्र, भागवद् एकादशीला सुक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा होत असल्याने अधिकाधिक भाविक रविवारी एकादशीचा उपवास करणार असून शहर परिसरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरे भाविकांनी गजबजणार आहेत. कार्तिक एकादशीच्या निमित्ताने विविध मंदिरांतून शनिवारी तयारी सुरू होती. सोमवारी (दि. 3) द्वादशी असून तुळशी विवाहाला सुऊवात होणार आहे. द्वादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्या सोयीनुसार तुळशी विवाह करता येतो. अश्विन अमावास्या किंवा बलिप्रतिपदेला (पाडवा) लक्ष्मीपूजन होत असते. काहीजण कार्तिक पौर्णिमेला करीत असतात. बुधवारी (दि. 5) कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी) असून शहापूर परिसरात बुधवारी लक्ष्मीपूजन होणार आहे. लक्ष्मीपूजन व तुळशी विवाहाच्या निमित्ताने ऊस, झेंडुची फुले, फळे यांची खरेदी सुरू आहे. तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी म्हणजे एकादशीला तुळशीचे केळवण करण्याची पद्धत आहे. केळवणसाठी लागणारे चिंच, आवळा, सौभाग्यवाण यांचीही खरेदी सुरू होती.