Vari Pandharichi 2025: पंढरपुरात देवाच्या रथाचे दर्शन, 251 वर्षांची परंपरा काय सांगते?
यावेळी खारीक, खोबरे, खडीसाखर या प्रसादाची उधळण करण्यात येते
By : चैतन्य उत्पात
सोलापूर : आषाढी एकादशी दिवशी सर्वच भाविकांना विठुरायाचे दर्शन होत नाही. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी आणि राही म्हणजेच राधिका यांची रथयात्रा आषाढी देवशयनी एकादशी दिवशी संपूर्ण नगर प्रदक्षिणा मार्गावरून दुपारी काढण्यात येते, ही परंपरा 251 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन गर्दीमुळे होत नाही, त्यांना देवाच्या रथाचे तरी दर्शन व्हावे, असा यामागचा उद्देश आहे.
जगीवाले यांच्या धर्मशाळेपासून रथयात्रा निघते. पेशवाई काळात गोविंदपंत खाजगीवले हे पेशव्यांचे सरदार आजच्या माहेश्वरी धर्मशाळेत वास्तव्यास होते, पूर्वीच्या काळीही पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी होत असे, या प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहत असत, गोविंदपंत खाजगीवले यांना श्री विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला.
अनेकांना दर्शन होत नसल्याने प्रत्येक आषाढी एकादशीला रथयात्रा काढून ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही, अशा भाविकांना दर्शनाचा लाभ रथयात्रेद्वारे घडू द्यावा, असे सांगितले तेव्हापासून म्हणजे सुमारे 251 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
या रथावर बसण्याचा मान पंढरपूर येथील नातू,रानडे, भाटे, देवधर या खाजगीवले यांच्या नातेवाईकांना आहे, तसेच रथ ओढण्याचा मान वडार समाजाला आहे. यावेळी खारीक, खोबरे, खडीसाखर या प्रसादाची उधळण करण्यात येते, देवाचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते.
खारीक, खोबरे उधळण्याची परंपरा
संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून दुतर्फा भाविकांची गर्दी असते. रथात श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता आणि राही म्हणजेच राधिका देवीची पितळी मूर्ती असते. रथावर खारीक, खोबरे उधळण्याची परंपरा आहे. मूळ रथ उत्तम दर्जाच्या सागवानी लाकडाचा असून याचे वजन 500 किलो एवढे आहे.