विठ्ठल हे ज्ञानाचे मूर्तिमंत रूप : संजीवाचार्य वाळवेकर
तरुण भारतच्या ‘विठू माऊली’ विशेषांकाचे प्रकाशन
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
पंढरपूर हे विठ्ठलाचे आवासस्थान आहे. ‘विदा ज्ञानेन ठ शून्याम्, लाती घृणाती विठ्ठला’ असे विठ्ठलाबाबत म्हटले जाते. म्हणजेच ज्ञान कोणाला नाही त्यांना विठ्ठल ज्ञान देतो. एका अर्थाने विठ्ठल हे ज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहे. विठ्ठलाने आपल्या कटीवर हात ठेवले आहेत, याचा अर्थ संसाररूपी सागरामध्ये तुम्ही बुडू नये ही माझी जबाबदारी असून तुम्ही माझ्यापर्यंत आला की मी तुम्हाला सावरणार आहेच, असे सांगून विठ्ठल आपल्याला आश्वस्त करतो, असे विचार ज्येष्ठ पुरोहित संजीवाचार्य वाळवेकर यांनी व्यक्त केले.
आषाढीच्या पार्श्वभूमीवर तरुण भारतच्या ‘विठू माऊली’ या आषाढी वारी 2026 पालखी विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी तरुण भारत कार्यालयात त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ज्यांना ज्यांना अज्ञान आहे त्यांना विठ्ठल ज्ञान देतो. हे ज्ञान तो गुरुंच्या माध्यमातून देतो. भगवान गुरुंना अनुग्रह करतो आणि गुरु आपल्या सर्वांना अनुग्रह देतात.
ज्यांना ज्ञान आहे ते गुरुजी होत. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी अशी संकटे येतात, अशा वेळी देवाला शरणागत व्हावे. कारण तोच या सर्व संकटांतून, व्याप आणि तापातून आपल्याला बाहेर येण्यास मदत करतो. आषाढ महिन्यात आषाढी एकादशी आणि पुढे येणारी गुरुपौर्णिमा हे दोन दिवस म्हणूनच महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.
प्रारंभी तरुण भारतच्या मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांनी प्रास्ताविक करताना आज आपला भवताल अस्वस्थ करणारा आहे. जगात सुरू असलेले युद्ध, देशात सुरू असलेले आंदोलन, नेमके काय खरे, असा संभ्रम निर्माण करणारे वातावरण आहे. अशा वेळी सर्व जातीपातीच्या भिंतींपलीकडे जाऊन सर्वांना समानतेच्या एकाच धाग्याने जोडून आषाढ वारी आपल्याला विनम्र भाव शिकविते. आपल्या प्रत्येकालाच पंढरपुरी जाणे शक्य नसले तरी पंढरपूरचे महत्त्व विविध ठिकाणच्या वारी, पालख्या, दिंडी सोहळा, विठ्ठल मंदिरे यांचा आढावा घेणारा ‘विठू माऊली’ हा विशेषांक तरुण भारतने प्रकाशित केला आहे, असे सांगितले. प्रतिनिधी रमेश हिरेमठ यांच्या हस्ते संजीवाचार्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.