Solapur : माघी एकादशीनिमित्त शहरात विठुनामाचा गजर
माधी एकादशीनिमित्त सोलापुरात भक्तीचा सोहळा
सोलापूर : माघ शुद्ध जया एकादशीनिमित्त सोलापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा पहाटे करण्यात आली. माधी यात्रेनिमित्त शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहरातील विविध मंदिरांमध्ये एकादशीनिमित्त भक्तांची रेलचेल दिसून आली.
एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठीमंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दर्शनरांगेत भाविकांसाठी मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत होते. हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल मंदिर परिसरासह संपूर्ण सोलापूर नगरी दुमदुमून गेली.
माधी एकादशीनिमित्त गुरुवारी (दि. २९) शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडा आरती, अभिषेक, महापूजा व प्रसाद वितरणाचा सोहळा पार पडला. काकडे विठ्ठल मंदिर, फलटण गल्ली येथे सकाळी सात वाजता अभिषेक व महापूजा झाली. त्यानंतर भाविकांना फराळीचा प्रसाद वाटप करण्यात आले.देगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात पहाटे काकडा आरती, त्यानंतरविष्णू सहस्त्रनाम व गीता पाठ सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत पार पडला.
याशिवाय चौपाड येथील विठ्ठल मंदिर, जुने विठ्ठल मंदिर, बुधवारपेठेतील माऊली मंदिर, बाळीवेस येथील टेलिफोन भवनाजवळील भडंगे विठ्ठल मंदिरासह शहरातील अन्य विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चा व आरती सोहळा उत्साहात झाला.
दरम्यान, सोलापूर शहरातून हजारो वारकरी, भाविक, पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे माघी वारीसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या माधी बारीसाठी सोलापूरचे बारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असून, विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्रद्धेने पंढरीकडे पावले टाकत आहेत.