सुकूर जमीन हडपप्रकरणी विठू नागवेकर गजाआड
पणजी : सुकूर गावातील कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयिताला विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली आहे. संशयिताच्या विरोधत म्हापसा पोलिसस्थानकात भारतीय न्याय संहितेच्या कलम 419, 465, 467, 468, 471, 199, 167, 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे याबाबत युरिको मस्कारेन्हा यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव विठू मधुकर नागवेकर (वय 48, साल्वादोर दो मुंदो बार्देश) असे आहे. विठू नागवेकर, अलिशा नागवेकर, आणि रणजीत साळगावकर (तत्कालीन सह मामलेदार बार्देश), रोहन कळसकर (तत्कालीन उत्तर गोवा विभागाचे कोमुनिदाद प्रशासक, म्हापसा), आणि अग्नेलो लोबो (सेऊला कमुनिदादचे अॅर्टनी) यांनी सर्वे क्रमांक 222/1, 222/1 व 233/3 मधील 69 हजार 675 जमिनीची बनावट कागदपत्रे केली होती. या संशयितानी 17 नोव्हेंबर 2017 रोजीच्या अर्जावर स्वर्गीय मधुकर विठुराई नागवेकर यांची बनावट स्वाक्षरी केली आणि संशयित विठू नागवेकर, अलिशा नागवेकर यांनी नावांमध्ये फेरफार करण्यासाठी बनावट ना हरकत दाखला आणि मान्यता मिळवली. त्यानंतर, त्यांनी मूळ मालकाचे नाव जमिनीच्या नोंदींमधून वगळण्यात यश मिळविले आणि स्वत:ची नावे नोंदवली, ज्यामुळे सेऊला कोमुनिदाद आणि इतर अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे.