Vari Pandharichi 2025: 'विठू माऊली' विशेषांकाचे एकादशीला प्रकाशन
आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर : मराठी वृत्तपत्र क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 'दैनिक तरुण भारत'ने यंदा आपल्या वैभवशाली पत्रकारितेत अजून एक झेंडा रोवला आहे. तो म्हणजे, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाचा सर्वात मोठा सामाजिक, सांस्कृतिक उत्सव असणाऱ्या पंढरीच्या आषाढी वारीचा विशेषांक सुरू केला आहे. 'विठू माऊली' नावाच्या या विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या आषाढी एकादशीला अर्थात ६ जुलै रोजी पंढरपुरात करणार आहेत.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील माणूस या वारीशी श्रद्धेने जोडलेला आहे. एवढेच नव्हे, तर देशातील विविध राज्यांमधूनही असंख्य भाविक या पवित्र वारीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. भारतीय समाजातील सर्व जातिधर्मांचे लोक ‘विठोबा’ या लोकदेवतेला आपलासा मानतात. त्यामुळे 'तरुण भारत'तर्फे दरवर्षी आषाढी वारीचे सविस्तर वार्तांकन करण्यात येते.
राज्य आणि परराज्यातून हजारो भाविक पिढ्यानपिढ्या भक्तिभावाने पंढरपूर येथे एकत्र येतात. भारताची ओळख असलेल्या विविधतेतील एकतेचे हे एक भव्य दर्शन आहे. या परंपरांचा, संस्कृतीचा, आणि इतिहासाचा समृद्ध अनुभव ‘विठू माऊली’ विशेषांकातून वाचकांना मिळणार आहे.
पंढरपूरमध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सुमारे ७५० मठ आणि धर्मशाळा कार्यरत आहेत. यांपैकी निवडक मठांचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या थोर परंपरा, विविध सांस्कृतिक चालीरीती, आणि ते करीत असलेले निरपेक्ष सामाजिक कार्य या सर्वांची सखोल, रोचक माहिती या विशेषांकात समाविष्ट करण्यात आली आहे. या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक संपत्तीचे जिवंत दर्शन घडेल.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. त्याचसोबत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, कोकण, गोवा येथे एकादशीलाच म्हणजे दिनांक ६ जुलै रोजी या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
संपूर्ण रंगीत, उत्कृष्ट आर्ट पेपरवर छापलेला, सुंदर छायाचित्रे आणि चित्रांनी सजलेला, आकर्षक मुखपृष्ठ आणि मांडणी असलेला हा अंक वाचनीय ठरणार आहे. या १०० पानी अंकाची किंमत १०० रुपये आहे. तुमच्या शहरातील प्रमुख विक्रेत्यांकडे हा अंक उपलब्ध असेल. अंक मिळण्यासाठी ७८९२३२७१४१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.