300हून अधिक विद्यार्थी अन् आधुनिक सुविधा; विठ्ठलापूर शाळेला बालरथाची गरज
पणजी : गोव्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या घटत असताना, विठ्ठलापूर-सांखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पूर्व-प्राथमिक वर्गांसह या शाळेत सध्या 300 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, आधुनिक सुविधा, सक्षम शिक्षकवर्ग आणि योग्य व्यवस्थापनामुळे पालकांचा सरकारी शाळेकडे वाढता कल दिसून येत आहे.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी 16 सुसज्ज वर्गखोल्या असून, प्रशस्त हॉल, प्ले हाऊस, स्वतंत्र स्टाफ रूम आणि ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वतंत्र नृत्य व संगीत कक्षही आहेत. तसेच ध्यान आणि योगासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात आहे.
शाळेत 16 तरुण व उत्साही शिक्षक कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि उपक्रमशील कार्यक्रम राबविले जात आहेत. याशिवाय 11 शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या दैनंदिन व्यवस्थेत योगदान देत आहेत.
सध्या 300 हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास आणखी विद्यार्थी शाळेत दाखल होऊ शकतात. त्यामुळे शाळेला बालरथाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
बालरथ उपलब्ध झाल्यास परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत येणे अधिक सुलभ होणार असून, भविष्यात शाळेची पटसंख्या 450च्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढती पटसंख्या कायम ठेवण्यासाठी आणि सरकारी शाळेकडे पालकांचा ओढा आणखी वाढविण्यासाठी बालरथ सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.