For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वनाथन आनंदला लिऑन मास्टर्सचा दहाव्यांदा किताब

06:43 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
विश्वनाथन आनंदला लिऑन मास्टर्सचा दहाव्यांदा किताब
Advertisement

वृत्तसंस्था/ लिऑन (स्पेन)

Advertisement

पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदने अंतिम फेरीत स्पेनच्या जॅमी सांतोस लतासा याचा 3-1 गुणांनी पराभव करून पुन्हा एकदा आपले अपवादात्मक कौशल्य दाखवून दिले आणि लिऑन मास्टर्सचा किताब दहाव्यांदा जिंकला. 54 वर्षीय आनंदने 28 वर्षांपूर्वी 1996 मध्ये येथे पहिले विजेतेपद जिंकले होते. ही स्पर्धा म्हणजे आपल्या पसंतीचे मैदान असल्याचे त्याने पुन्हा दाखवून दिले आहे.

या स्पर्धेत आनंदचा देशबांधव आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला अर्जुन एरिगेसी आणि बल्गेरियन वेसेलिन टोपालोव्ह यांच्यासह चार खेळाडूंचा समावेश होता. प्रत्येक फेरीत चार लढतींचा समावेश होता, ज्यामध्ये प्रति खेळाडू 20 मिनिटे इतका वेळ दिला गेला. दुसऱ्या उपांत्य फेरीत अर्जुनला सांतोस लतासाविऊद्ध 1.5-2.5 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही खेळाडूंच्या रेटिंगमधील महत्त्वपूर्ण फरक लक्षात घेता स्पॅनिश खेळाडूसाठी हा एक उल्लेखनीय विजय राहिला.

Advertisement

त्याआधी पहिल्या उपांत्य फेरीत टोपालोव्ह आणि आनंद यांच्यातील लढतीचा समारोप शेवटी आनंदच्या विजयाने झाला. आनंदने उर्वरित तीन लढती बरोबरीत सोडवताना तिसऱ्या लढतीत विजय मिळवला. अंतिम फेरीच्या पहिल्या लढतीत सांतोस लतासाने आनंदवर भरपूर दबाव आणला, तर दुसरी लढत शेवटी बरोबरीत संपली. आनंदने तिसरा सामना काळ्या सोंगाट्यांसह जिंकला. अंतिम लढतीत काळ्या सोंगाट्यांसह जिंकण्याचे कठीण आव्हान सातोस लतासासमोर होते. त्याच्या गुंतागुंत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना न जुमानता आनंद निश्चयी राहिला आणि हा सामना 37 चालींत संपून आनंदने स्पर्धेचे जेतेपद मिळविले.

Advertisement
Tags :

.