विश्वनाथन आनंद पुन्हा ‘फिडे’च्या उपाध्यक्षपदी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आणि व्यावसायिक असलेले 38 वर्षीय तैमूर टुरलोव्ह हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे सर्वांत तऊण अध्यक्ष बनले आहेत. त्यांच्यासोबत माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आनंद हे टुरलोव्ह यांच्या गटाकडून निवडणूक लढवत होते.
फिडेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे पार पडली. बुद्धिबळातील ‘टाय-ब्रेकर’ किंवा स्थगित झालेला सामना जिंकण्यासारखीच ही स्थिती होती. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला 50 टक्के अधिक एक मते न मिळाल्याने टुरलोव्ह-आनंद जोडीने दुसऱ्या फेरीत विजय मिळवला. या निवडणुकीत जर्मनी आणि कझाकस्तानच्या व्यावसायिकांचा समावेश राहून तीन गटांत तिरंगी लढत झाली. अध्यक्षपदासाठी जान हेनरिक बुटनर आणि उपाध्यक्षपदासाठी माल्कम पेन, अध्यक्षपदासाठी वादिम रोझेनस्टीन आणि उपाध्यक्षपदासाठी गॉर्डन टँग तसेच अध्यक्षपदासाठी तैमूर टुरलोव्ह आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद.
पहिल्या फेरीत एकूण 196 वैध मते पडली, त्यापैकी टुरलोव्ह यांना 96, रोझेनस्टीन यांना 76 आणि बुटनर यांना 20 मते मिळाली, तर चार मते अवैध ठरली. टुरलोव्ह-आनंद जोडी विजयापासून केवळ एका मताने दूर राहिली होती. नियमांनुसार, टुरलोव्ह आणि रोझेनस्टीन दुसऱ्या फेरीत आमनेसामने आले. यावेळी टुरलोव्ह यांच्या गटाला 110 मते मिळाली आणि रोझेनस्टीन यांच्या गटाला 85 मते मिळाली. या विजयामुळे टुरलोव्ह ‘फिडे’चे आठवे अध्यक्ष बनले आहेत, तर आनंद यांना उपाध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ मिळाला आहे.