For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूरग्रस्त भागांना तत्काळ भेट द्या!

06:12 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पूरग्रस्त भागांना तत्काळ भेट द्या
Advertisement

जिल्हा पालकमंत्री, प्रभारी सचिवांना मुख्यमंत्र्यांची सूचना : उद्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून नद्या, जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पावसामुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संबंधित जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हा प्रभारी सचिवांना पूरग्रस्त भागांना तत्काळ भेट देऊन मदतकार्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत.

Advertisement

बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांकडून राज्यात विविध ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 26 मे पर्यंत एकूण 45 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर 1,385 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हा प्रभारी सचिवांनी पावसाने बाधित झालेल्या आणि पूरग्रस्त भागांना तत्काळ भेट देऊन परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनीही पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून तातडीने मदतकार्य हाती घ्यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात व्यापक आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या मुख्य सचिवांना 30 आणि 31 मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रभारी सचिवांची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील 170 तालुके पूर/भूस्खलन-प्रवण तालुके म्हणून ओळखली गेली आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार 2,296 काळजी केंद्रे/निवारा केंद्रे उभारण्यात येतील. बेंगळूर महानगरपालिका अधिकारक्षेत्रातील 201 ठिकाणे पूरप्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. 26 मेपर्यंत राज्यातील 45 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर 1,385 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यापैकी 99 टक्के नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील पीडी खात्यात 97,351.95 लाख रुपयांच निधी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.