अभंगांतून विठुरायाच्या साजिरे गोजिरे रुपाचे दर्शन
सरस्वती वाचनालयातर्फे आयोजन : पं. राजप्रभू धोत्रे यांनी सादर केले संगीत भजन
बेळगाव : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटात वैष्णवांचा मेळावा भरतो. लाखो भाविक पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला पायी जातात. परंतु प्रत्येकालाच तिथपर्यंत पोहोचणे शक्य नसते. अशा भाविकांना विठुरायाचे साजिरे गोजिरे रूप अभंगांच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथांच्या अभंगांचा सुरेल कार्यक्रम पार पडला. पं. राजप्रभू धोत्रे यांनी सादर केलेल्या भक्ती संगीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. सरस्वती वाचनालय शहापूरतर्फे वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कै. संजय सिंदगी यांच्या स्मरणार्थ बुधवारी संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पं. राजप्रभू धोत्रे यांचा ‘चैतन्याच्या ठायी पांडुरंग’ हा सुरेल अभंगाचा कार्यक्रम पार पडला.
‘रूप पाहता लोचनी’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, आवडीने गावे हरि नाम घेसी, तुझे नाम घेता लाजले अमृत, नाम गाऊ नाम घेऊ, सदा माझे डोळा, माझ्या जिवाची आवडी, वात्सल्याची मूर्ती सावळा श्रीरंग, सोनियाचा दिवस आज, आल्या आल्या पाच गवळणी, लई नाही मागणं आदी अभंग सादर केले. युगे अठ्ठावीस या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल चौधरी यांनी केले. तबला साथ अंगद देसाई, संवादिनी साथ सारंग कुलकर्णी, तानपुरा साथ योगेश रामदास व मंजुश्री, टाळ साथ सुधीर बोंद्रे, गुरुराज राव व नारायण हिरेकोळ यांनी संगीत साथ दिली. यावेळी नागरिकांनीही आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.