वारीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन
प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे प्रतिपादन : वरेरकर नाट्या संघ सभागृहात वारीतील छायाचित्र प्रदर्शन : सामाजिक सलोखा वारीतील महत्त्वाचे अंग
बेळगाव : विठ्ठलाच्या वारीत भाषेचा मोठा प्रभाव असतो. वारकरी सांप्रदायाने भाषा टिकवून ठेवली आहे, हे आपण वारीच्या माध्यमातून पाहतो. आजकाल सर्वजण सेल्फीमध्ये गुंतले आहेत. मात्र, वारीच्या छायाचित्रांतून भाव समजतो. वारी ही सर्वांना भावणारी असते. वारीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा दिसून येतो. वारीतील हे एक महत्त्वाचे अंग आहे, असे मत प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी व्यक्त केले. लोकमान्य ग्रंथालय, कलावकाश आणि मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लोकमान्य ग्रंथालयाच्या वरेरकर नाट्यागृहात महाराष्ट्रातील वारी परंपरेतील ‘आनंद वारी’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वारी छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संदेश भंडारे यांनी उत्कृष्ट छायाचित्रकलेतून आपली कला सादर केली.
वारीसाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील अनेक दिंड्या, वारीचा इतिहास, त्यातील शिस्त, पताकाधारी, टाळकरी, वीणेकरी, मृदंगधारी, अभंग गाणारे, अठरापगड जातीतील भाविक, सकाळपासून सायंकाळपर्यंत वस्तीवर पोहचेपर्यंत त्यांची दिनचर्या, चालणे, एकमेकांना साहाय्य करण्याची भावना, अनोळखी असूनही जिव्हाळा, देवासमोर सर्व समान ही भावना व तसे आचरण यांची अप्रतिम दृश्ये, तर दिवेघाटातील डोळ्यांचे पारणे फेडणारे विहंगम वळण यातून संदेश भंडारींनी रसिकांना वारीचा अनुभव दिला. भंडारे म्हणाले, वारीतून वारकऱ्यांनी भाषा टिकवून ती समृद्ध केली. वारीमध्ये वारकरी संप्रदायाकडून अभंग गायिले जातात. दिंडीमध्ये सहभागी होणारे भाविक वारकऱ्यांच्या अभंगांमध्ये चिंब होतात. देशातील अनेक राज्यांमध्ये अभंगांचा त्या त्या भाषेमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. यामुळे परराज्यांमध्येही अभंगाची गाथा गायिली जाते. वारीमध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे वारकरी व भाविक अभंग गाऊन भक्तीरसात न्हाऊन निघतात, असे त्यांनी सांगितले.
मोठ्या दिंड्यांमध्ये नेटके नियोजन करण्यात येते. दिंडीच्या दंडाधिकाऱ्यांकडून विविध सूचना करण्यात येतात. दिंडीमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन वारीचा दिलखुलास आनंद लुटतात. वारीमध्ये प्रत्येक वयोगटातील वारकरी भाविक फुगडी, अमृतमंथनसह विविध खेळ खेळतात. वारीतील खेळातून स्त्री-पुरुष समानता दर्शविली जाते. भव्य रिंगणाच्या माध्यमातून समानतेचा संदेश दिला जातो. त्याचबरोबर वारीतून शेतकरी आपले पीक विठ्ठलाला अर्पण करत असतात, अशा विविध छायाचित्रांतून भंडारे यांनी वारीतील अनुभव कथन केले. स्वाती कुलकर्णी, संजिवनी गुर्जर यांच्यासह श्रोते उपस्थित होते. वैभव लोकूर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देऊन आभार मानले.