कर्तव्य पथावर संस्कृती-सामर्थ्याचे दर्शन
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण : इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो प्रमुख पाहुणे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी 76 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्य पथावर तिरंगा फडकावला. याप्रसंगी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले होते. यावेळी प्रजासत्ताक दिनाची थीम ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ या थीमखाली विविध राज्यांनी आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी आपापले चित्ररथ सादर केले. तसेच संरक्षण दलाच्या विविध विभागांनी आपली प्रात्यक्षिके दाखवत राजधानी दिल्लीत संस्कृती आणि सामर्थ्य यांचे दर्शन देशवासियांना घडवले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथींच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने परेडची सुरुवात झाली. 300 कलाकारांनी वाद्ये वाजवत परेड काढली. त्यानंतर विशेष आमंत्रित करण्यात आलेल्या इंडोनेशियन लष्करी जवानांच्या तुकडीनेही सादरीकरण केले. भारतीय सैन्याच्या जवानांनी भीष्म टँक, पिनाक मल्टी लाँचर रॉकेट सिस्टीमसह मार्च केले. यावेळी पहिल्यांदाच प्रलय क्षेपणास्त्र परेडमध्ये दिसून आले.
हवाई दलाच्या फ्लायपास्टमध्ये 40 विमानांनी भाग घेतला. यामध्ये 22 लढाऊ विमाने, 11 वाहतूक विमाने आणि 7 हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या फ्लायपास्टमध्ये अपाचे, राफेल आणि ग्लोब मास्टर ही विमाने सहभागी होती. त्यापाठोपाठ 15 राज्ये आणि 16 मंत्रालयांचे चित्ररथ दिसून आले. पहिल्यांदाच 5 हजार कलाकारांनी कर्तव्य पथावर एकत्र सादरीकरण केले. विजय चौकातून सकाळी 10:30 वाजता परेड सुरू झाली होती.

हवाई दलाच्या परेडची सुरुवात चार एमआय-17 विमानांच्या ध्वज निर्मितीने होईल. या एमआय-17 मध्ये तिरंगा आणि भारतीय सशस्त्र दलांचे तीन ध्वज दिसून आले. यानंतर, देशातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांनी उ•ाण केले. या विमानांनी पाच फॉर्मेशन तयार केली होती. या परेडमध्ये लष्कराचा टी-90 भीष्म टँक, ब्रह्मोस आणि पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली, आकाश शस्त्र प्रणाली, सारथ (पायदळ वाहून नेणारे वाहन बीएमपी-2), 10 मीटर शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टम अग्निबाण यांचा समावेश होता. ब्रह्मोस, पिनाक आणि आकाश सारखे प्रगत संरक्षण प्लॅटफॉर्म देखील परेडचा भाग होते.
या वर्षीच्या परेडमध्ये लष्कराने दोन नवीन वैशिष्ट्यो जोडली. यामध्ये बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीमचा समावेश करण्यात आला. तर डीआरडीओच्या देखाव्यामध्ये कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलयचे प्रदर्शन दाखविण्यात आले. याशिवाय, डीआरडीओने आपल्या ‘रक्षा कवच - मल्टी लेयर प्रोटेक्शन अगेन्स्ट मल्टी-डोमेन थ्रेट’ अंतर्गत देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या नवोपक्रमांचे प्रदर्शन घडवले.
कर्नाटकच्या चित्ररथात दगडी शिल्पांचे प्रदर्शन
यावर्षी कर्तव्य पथावर ज्या 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ प्रदर्शित केले जातील त्यामध्ये गोवा, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, चंदीगड, दिल्ली दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव यांचा समावेश होता. कर्नाटकच्या चित्ररथात लक्कुंडीच्या दगडी शिल्पांचे प्रदर्शन करण्यात आले. ते राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रदर्शन करत होते. गोव्याच्या चित्ररथातून राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. त्यात गोव्याचे लोकनृत्य, कला आणि संगीताचे प्रदर्शन करण्यात आले. मध्यप्रदेशच्या चित्ररथाची थीम ‘चित्ता - भारताचा अभिमान’ ही होती. तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभावर आधारित होता. दिल्लीच्या चित्ररथाचा विषय दर्जेदार शिक्षण असा होता.