‘व्हिजन कर्नाटक’ प्रदर्शनाचे उद्यापासून आयोजन
तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात विविध उद्योगांची माहिती
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांच्यावतीने 11 ते 13 जूनदरम्यान व्हिजन कर्नाटक-2025 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरूनगर येथील केएलई शताब्दी सभागृहात हे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनामध्ये केंद्र सरकारच्या योजना तसेच विविध विभाग यांची माहिती दिली जाणार असल्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारअंतर्गत येणारे विभाग तसेच विविध कंपन्यांकडून माहिती दिली जाणार आहे. यामध्ये डिफेन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, अॅग्रीकल्चर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रेल्वे, बँकिंग, कॉमर्स अँड ट्रेड, हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, एमएसएमई, फार्मास्युटिकल, शिपिंग अँड वॉटरवे, वॉटर रिसोर्सेस व टेक्स्टाईल या विभागातील सरकारी कंपन्यांचा प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे.
कर्नाटकात प्रथमच अशाप्रकारे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विद्यार्थी तसेच नवउद्योजकांना प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार शेट्टर यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, हणमंत कोंगाली, गीता सुतार, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, अॅड. एम. बी. जिरली यासह इतर उपस्थित होते.