महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शन मात्रे मन...2

06:36 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्याकडे वेद, पुराण शास्त्र आहेत. त्या त्या शास्त्रांना दर्शनं म्हणतात. सांख्य दर्शन, वैशेषीक दर्शन, बौद्ध दर्शन ही सगळी दर्शनं दाखवणारी शास्त्र आपल्याला वाद घालताना आधार देतात. खरंतर शास्त्र म्हणजे संशोधन करणारे किंवा विशिष्ट गोष्टींची दिशा दाखवणारी असतात. ही दर्शनं आपल्याला अभ्यास करायला कल्पना करायला किंवा विचार करायला मार्गदर्शक ठरतात. पण प्रत्यक्ष अनुभूती किंवा दर्शन मात्र निसर्गात घडत असते. ऋषीमुनी यांना द्रष्टे म्हटलं जायचं. तर निसर्ग प्रत्यक्ष निर्माण करतो म्हणून त्याला सृष्टी असं म्हणतात. त्यामुळे सृष्टीमध्ये मनाच्या कल्पना करायची शक्यताच नसते. म्हातारपणी अनेकांना अशी अप्रत्यक्ष दर्शने घडत असतात. कल्पनेतल्या गोष्टी डोळ्यासमोर घडत आहेत असं त्यांना वाटतं.  वेगवेगळ्या व्यक्तींचे, आभास व्हायला लागतात, प्राण्यांचे आवाज येतात, अशावेळी त्यांच्या मनाच्या दर्शनाचा प्रयोग सुरू झाला आहे असं समजायला हरकत नाही. अशा स्वप्नांचा प्रयोग सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतो. काहींना जागेपणी आठवतो तर काहींना तो आठवतही नाही. स्वप्न किंवा मृगजळ हे डोळे उघडे ठेवून किंवा मिटून दोन्ही अवस्थेत अनुभवता येतात. यामध्ये मनाची भूमिका मात्र भक्कम असते. खरंतर सगळ्यांनीच स्वप्नांची दर्शनं घेतली पाहिजे. कारण त्यात ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी अनुभूती असते. अशी उत्कट अवस्था अनेक प्रतिभावंत, राजकारणी, चित्रकार, वास्तुशास्त्रज्ञ, अनुभवत असतात. यामध्ये तुमचं मन ड्रोन सारखं सर्व दिशांमधून तुम्हाला फिरवून ती घटना किंवा वास्तू  दाखवत असतात. अगदी एखादं त्रिमिती चित्र बघावं तसं. बरेचदा यातूनच अनेक गोष्टींची नवनिर्मितीची पायाभरणी होत असते. म्हणूनच मनाच्या या दर्शनाचे फार मोठे महत्त्व आपल्या जगण्यामध्ये आहे. नाटक सिनेमातून असेच गतीचे, सौंदर्याचे अचाट कल्पनांचे शक्तीचे प्रदर्शन घडत असते. चित्राच्या सहाय्याने रंगरेषातून अनाकलनीय गोष्टीचे दर्शन आम्ही नेहमीच बघत असतो. डोळे मात्र या सगळ्याचा अर्थ लावत बसतात. कवितेत मात्र शब्दाच्या साह्याने प्रतिभेचे, भावनांचे दर्शन घडत असते. ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’ म्हणजेच आमचे डोळे आणि मन एकाच वेळी या दर्शनाच्या कामात गुंतलेले असतात. रंगभूषा, वेशभूषा आमच्या डोळ्यांना भावतात तर त्या मागच्या भावना मनाला जाणवतात. डोळे जरी बघत नाही म्हटले तरी मन त्या दर्शनासाठी धावतच असते. आणि कल्पनेनेच ती व्यक्ती तो प्रसंग न बघताही आम्ही बघत असतो. अनेकदा आपण भगवंताच्या दर्शनाच्या कथा वाचतो ज्यांना ज्यांना अनुभूती आली आहे त्यांनी रंग, गंध, नाद, प्रकाश, विभूती अशा दर्शनाच्या माध्यमातून त्याचं वर्णन केलंय. सृष्टीच्या कणाकणात जर तो ईश्वर भरलेला असेल तर आपलं जगणं म्हणजे रोज त्याचं दर्शन घडणं असंच असतं. पण आम्ही आमचे भावविश्व जसं घडवतो तसा तो आम्हाला भेटतो. म्हणजेच गायकाला नादब्रम्हातून दिसतो, ऐकू येतो तर साहित्यिकाला शब्द ब्रह्मातून, चित्रकाराला, स्थापत्यकाराला रंगरेषातून उमगतो तर मूर्तिकाराला दगडातून साकारता येतो. या सगळ्यांना तो भेटतो कारण या सगळ्यांनी त्यांच्या भावावस्थेची शेवटची पायरी, म्हणजे शरणागत स्थिती गाठलेली असते. अहंकार विरहित अवस्थाच अशी दर्शनं घडवते म्हणूनच ‘मनाच्या कारणे, दर्शनाची तोरणे’ अशी आपली अवस्था असते. आणि म्हणूनच आमच्या संतांनी ‘दर्शन मात्रे मन कामना पूर्ती’ या ओळी लिहिल्या असाव्यात.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article