विश्वनाथ, गंगा, हितेश विजयी
वृत्तसंस्था, जकार्ता
येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटातील आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताचे विश्वनाथ सुरेश, गंगा आणि हितेश यांनी आपल्या वजन गटातून प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले.
पुरूषांच्या 50 किलो वजन गटातील लढतीत आशियाई चॅम्पियन विश्वनाथ सुरेशने उझ्बेकच्या इस्मोलोव्हचा सरस गुणांवर पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. तसेच 55 किलो गटात भारताच्या गंगाने मंगोलियाच्या बुलगानखुचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. पुरूषांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या हितेशने चीन तैपेईच्या झेंग लीनवर 5-0 अशा गुणांनी एकतर्फी मात केली. मात्र 60 किलो वजन गटात जपानच्या नेकायामाने भारताच्या सागर जाखरचा पराभव केला. महिलांच्या विभागात भारताच्या तानुने 51 किलो वजन गटात कोरियाच्या किमचा 5-0 अशा गुणांनी फडशा पाडत पुढील फेरी गाठली.