गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुन्हा दिल्लीला; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट
विशेष प्रतिनिधी : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी पुन्हा नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांत राणे यांच्या दिल्ली भेटी वाढल्या असून, केंद्रीय नेतृत्वातील नेत्यांसोबत त्यांच्या होत असलेल्या भेटींकडे गोव्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत राणे यांनी ‘एक्स’वर माहिती देताना, विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. शहा यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वीच्या दिल्ली दौऱ्यात राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय संघटनात्मक पदाधिकारी आणि अन्य केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सातत्याने होत असलेल्या दिल्ली दौऱ्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी गोवा दौऱ्यात गोव्याशी संबंधित विषयांवर आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर राणे आणि शहा यांच्यात झालेल्या या भेटीमुळे त्याकडे राजकीयदृष्ट्या लक्ष वेधले गेले आहे.