For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ रंगकर्मी बाळ पुजारे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा

04:04 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ रंगकर्मी बाळ पुजारे यांचे निधन  92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Advertisement
नेरूर : मूळ कुडाळ तालुक्यातील वालावल गावचे सुपुत्र आणि गेली अनेक वर्षे पुणे येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू गणेश पुजारे उर्फ बाळ पुजारे (92) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य, संगीत आणि अभिनय क्षेत्रातील एका ज्येष्ठ मार्गदर्शकाचा काळ संपला असून, जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बाळ पुजारे यांनी मराठी नाट्यसृष्टीसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय होते. नटवर्य भालजी पेंढारकर यांच्या सहवासात त्यांनी सामाजिक आणि संगीत नाट्यक्षेत्रात महाराष्ट्रभर काम केले. ग्रामीण भागातील अनेक युवा कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक कलाकार आज कला क्षेत्रात प्रतिष्ठित स्थानावर आहेत. गायक आणि वादक कलाकारांनाही त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून दिले.

Advertisement

वालावल गावातील श्री देव लक्ष्मीनारायण यांच्यावर त्यांची विशेष श्रद्धा होती. गावी आल्यानंतर ते देवाच्या सेवेत वेळ घालवत असत. नेरूर येथील श्री देव कलेश्वराच्या रंगमंचावर माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त ओम शिवकृपा कला क्रीडा मंडळातर्फे सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. नेरूर गावातील अनेक सामाजिक नाटकांमधून आणि एकांकिकांमधून कलाकारांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

नेरूर-चव्हाटा येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त सादर झालेल्या ‘शाबास बिरबल शाबास’ या नाट्यप्रयोगासाठी नटवर्य भालचंद्र पेंढारकर उर्फ अण्णा यांनी मुंबईहून येऊन मार्गदर्शन केले होते. ललित कलादर्शनसारख्या नामवंत संस्थेच्या बॅनरखाली हा प्रयोग दिल्ली आणि सांगली येथे सादर झाला. या प्रयोगाचे दिग्दर्शक म्हणून बाळ पुजारे यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

Advertisement

‘वाहतो दुर्वांची जुडी’ आणि ‘शाबास बिरबल शाबास’ या गाजलेल्या नाट्यप्रयोगांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेल्या. त्यांनी अनेक राज्यस्तरीय नाट्य आणि एकांकिका स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही काम पाहिले. नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

अभिनय, संवादफेक, संगीत आणि नाट्यकलेत पारंगत असलेल्या बाळ पुजारे यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.