विशाळगड मुक्ती मोहिम 13 ऐवजी 14 जुलै रोजी; शिवभक्तांच्या आग्रहाखातर तारखेत बदल; संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा भेदून विशाळगडावर पोहचले होते. त्यामुळे याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून 13 जुलै 2024 रोजी हजारो शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाऊन अतिक्रमण हटविण्याचा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या मोहिमेस असंख्य शिवभक्तांचा प्रतिसाद लाभत आहे. पण ही मोहिम शनिवार ऐवजी रविवारी आयोजित करावी अशी मागणी राज्यभरातील अनेक शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. शिवभक्तांच्या या मागणीचा विचार करून छत्रपती संभाजीराजे यांनी 13 जुलै ऐवजी रविवार 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीराजे गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी 07 जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक बोलवली होती. या बैठकीत या मोहिमेसाठी 13 जुलै रोजीचे ऐतिहासिक औचित्य साधण्याचा निर्णय झाला होता. पण शिवभक्तांच्या आग्रहास्तव ही मोहिम 13 जुलै ऐवजी रविवारी (14 जुलै) रोजी आयोजित केली असल्याचे संभाजीराजें छत्रपती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.