'ती' जिवंत म्हैस रात्रभर हंबरत होती, विशाळगडाच्या मारुती कड्याजवळ नेमंक काय घडलं?
दरीच्या दगडाला तटल्यामुळे जिवंत म्हैस रात्रभर हंबरत होती, तिच्या गळ्यातील घंटा वाजत होती
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : विशाळगडावरचा मारुती कडा. किती फूट खोल माहिती नाही. पण दरीची खोली इतकी, की तळाचा माणूस वरून दिसूही शकत नाही. त्या दरीत शुक्रवारी प्रकाश गुरव यांच्या तीन म्हशी कोसळल्या. दोन म्हशी अगदी तळापर्यंत गडगडत गेल्या. आणि जागीच मृत झाल्या. एक म्हैस मात्र मध्येच एका मोठ्या दगडाला टेकून अडकली. प्रकाश गुरव हा कड्याच्या टोकावरून त्या जिवंत म्हशीला रात्रभर साद देत राहिला. तरीही त्याला रहावलेच नाही. दोराचा आधार घेत तो दरीत उतरला आणि पुन्हा दोराच्या सहाय्याने वरती आला.
दरीच्या एका दगडाला तटल्यामुळे जिवंत असलेली म्हैस रात्रभर विचित्रपणे हंबरत होती. तिच्या गळ्यातील घंटा वाजत होती. एक तरी म्हैस जिवंत आहे म्हणून प्रकाशची तिला वाचवण्याची धडपड सुरू होती. दुसरा दिवस उजाडला. प्रकाशची कड्याच्या काठावरची हतबल अवस्था पाहून विशाळगडावरील तरुण एकत्र आले. त्यांनी मोठे दोर घेतले. प्रकाश आणि दोघे तिघे सहकारी त्या दोराला धरून दरीत उतरले. जिवंत म्हशीला त्यांनी चारा-पाणी दिले आणि म्हैस आणखी खाली पडू नये किंवा तिला दोरीच्या सहाय्याने वरती ओढावे, या हेतूने त्यांनी म्हशीला दोराने बांधले.
सर्व गावकऱ्यांनी मिळून ताकदीने तो दोर ओढून म्हशीला वर आणायचे ठरवले. अख्खे विशाळगड प्रकाशच्या मदतीला या क्षणी धावून आले. दरीत अनेक अडथळे, खाचाखोचा. त्यामुळे म्हशीला वर ओढून आणणे फार कठीण होते. म्हैस मुळातच जखमी होती. तिला वर ओढायचा प्रयत्न केला की वेदनेने व्याकुळ व्हायची. जीव तोडून ओरडायची. पण त्या म्हशीला सर्वांनी मिळून बऱ्यापैकी ओढून निम्म्यापर्यंत आणले. पण पुन्हा एकदा घसरून म्हैस खाली गेली. पुन्हा तिला ओढून वर आणायची कसरत सुरू झाली. या प्रयत्नात म्हशीच्या अंगाची सालटे निघू लागली, तरीही बऱ्यापैकी त्या म्हशीला वर ओढत आणले.
पण कड्याच्या टोकावर येण्यापूर्वीच तिनेही वेदना सहन न झाल्याने प्राण सोडले. आत्तापर्यंत आपला धीर रोखून धरलेल्या प्रकाशचा त्या क्षणी मात्र धीर सुटला आणि तो दरीकडे पाहून आक्रोश करू लागला. साऱ्या दरीत त्याचा आक्रोश घुमू लागला. लोकांनी वरूनच प्रकाशची समजूत काढली. प्रकाश आणि त्याच्यासोबत गेलेल्या इतर सहकाऱ्यांना दोराच्या सहाय्याने दरीतून वर घेतले. तरीही प्रकाश मात्र दरीतील म्हशीला आधार देण्यासाठी दरीच्या काठावरच बसला. अधूनमधून आपण येथे आहे, हे म्हैशीला कळावे म्हणून रात्रभर आवाज देत, साद घालत राहिला. पण खरी कथा त्यापुढेच..
प्रकाश गुरव आणि त्याचे कुटुंबीय विशाळगडावरचे पिढ्यान् पिढ्याचे रहिवासी. मध्यंतरी विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत त्यांचे नवीन घर गेले. त्यांचा चहाचा खोकाही काढला गेला. त्यामुळे तीन म्हशीचे दूध डेअरीला घालून त्या कुटुंबाची उपजीविका सुरू होती. पण काळ कसा येतो बघा.! विशाळगडाच्या मारुती कड्यावर नेहमी चरणाऱ्या तीन म्हशी एकापाठोपाठ एक दरीत कोसळल्या. मारुती कड्याची ही दरी म्हणजे वर ओरडले, की दरीतून तसाच उसळून प्रतीध्वनी उमटवणारी. त्या दरीत त्यांच्या तिन्ही म्हशी पडल्या. उदरनिर्वाहाचा त्याचा मार्गच खुंटला. एक जिवंत म्हैस दरीतून वर काढण्यासाठी विशाळगडचे सर्व रहिवासी एकत्र आले.
हिंदू-मुस्लिम सर्वांचीच मदत
विशाळगडावरचा जो प्रश्न आहे तो नक्कीच आत्ताचा नाही. खूप-खूप जुना आहे. पण प्रत्येकाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने तो अक्षरश: गडाएवढाच साचला आहे. या पार्श्वभुमीवर प्रकाश गुरव आणि त्याच्या तीन म्हशी हे केवळ एक उदाहरण आहे. पण अगदी कडक नियम, अटी घालून विशाळगडचे जनजीवन पुन्हा सुरू व्हावे, अशीच सर्वांची भावना आहे. त्यातही आशेचा किरण हा की, तीन म्हशीच्या मृत्यूने खचलेल्या प्रकाश गुरव याला गडावरच्या हिंदू मुसलमानानी एकत्र येऊन एक तरी म्हैस त्याला घेऊन देण्याची तयारी चालवली आहे.
विशाळगड अनुभवत आहे नि:शब्द शांतता
आता या क्षणापासून प्रश्न आहे तो प्रकाशच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा. विशाळगडची दंगल झाली. कारवाई झाली. कोण बरोबर कोण चूक, हे आता कोर्ट ठरवणार आहे. पण त्याआधी सारा विशाळगडच एक नि:शब्द शिक्षा गेले दहा महिने भोगतो आहे. पर्यटक, भाविक संख्येने खूप कमी आहेत. गडावर बाहेरच्या एकाही माणसाने रहायचे नाही, अशी अट आहे. त्यामुळे गडावर शुकशुकाट आहे. गडावर पर्यटक, भाविकांना सेवा देऊन उदरनिर्वाह करणारे हिंदू-मुस्लिम दोघेही अडचणीत आहेत. कामाला बाहेरगावी जात आहे. काहींनी तर घराला कुलपेच लावली आहेत. जवळजवळ त्यांनी विशाळगड सोडलाच आहे.