विशाल पाटील यांचा अर्ज दाखल ! आज जोरदार शक्तीप्रदर्शन
गणपती मंदिरापासून पदयात्रा : काँग्रेस कमिटीसमोर मेळाव्याची जय्यत तयारी: दुष्काळ फोरममधील अनेक नेते उपस्थित राहणार
सांगली प्रतिनिधी
महाविकास आघाडीने सांगलीची जागा काँग्रेसकडून शिवसेनेला दिल्याने काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाकडून आणि एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. पण, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेवून ते काँग्रेस कमिटीपर्यंत पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून याठिकाणी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला दुष्काळ फोरममधील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
विशाल पाटील यांच्यावर जाणून-बुजून अन्याय करण्यात आला आहे. अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली आहे. दादा घराण्यावर आणि त्यांच्या वारसाच्यावर अन्याय केला जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीत उभा करायचा असा निर्धार केला आहे. या कार्यकर्त्यांच्या निर्धारानुसार आता विशाल पाटील यांनी सोमवारी एक काँग्रेस पक्षाकडून एक अपक्ष असा अर्ज दाखल केला आहे. आता मंगळवारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते या निवडणुकीची घोषणा करणार आहेत.
सकाळी साडेनऊ वाजता गणपती मंदिरापासून पदयात्रा
विशाल पाटील हे सकाळी साडे नऊ वाजता सांगलीच्या गणपती मंदिरात जावून गणेशाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे. या पदयात्रेचे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टीही केली जाणार आहे. ही पदयात्रा काँग्रेस कमिटीजवळ आल्यानंतर त्याठिकाणी मेळावा होणार आहे.
विशाल पाटील यांच्याबरोबर दुष्काळ फोरममधील नेते
विशाल पाटील यांच्याबरोबर आता जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे सक्रियपणे प्रचारात उतरणार आहेत. त्यांनी सोमवारी तशी घोषणा केली आहे. त्याबरोबरच दुष्काळ फोरममधील अन्य नेतेही यानंतर प्रचारात सक्रीय सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच काँग्रेसचे पहिल्या फळीतील काही नेते आणि दुसऱ्या फळीतील सर्व नेते ही या प्रचारात सक्रीयपणे उतरणार आहेत.