विशाल यांच्या बंडखोरीचा अहवाल दिल्लीला; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवूनच अहवाल; काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार
सांगली प्रतिनिधी
सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा अहवाल आपण दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आजच पाठविला आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार बैठकीत बोलताना स्पष्ट केले. तसेच सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्याचा आदेश दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही हतबल नाही. देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे आम्ही भाजपाविरूध्द सर्व विरोधी पक्षाची एक मूठ बांधली आहे. हे करताना थोडाफार आमच्या पक्षाला त्रास झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज आहेत. सांगलीतही तीच परिस्थिती आहे. पण सांगलीच्या कार्यकर्त्यांची आपण समजूत काढून त्यांना शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. त्यानुसार आता ते प्रचारात उतरलेले दिसतील, असेही स्पष्ट केले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या जागेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्या जाणून घेवून त्यांचा राग शांत करून आम्ही त्यांना भाजपच्या विरोधात आपली लढाई आहे. त्यामुळे आघाडी अंतर्गत वादविवाद न करता अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा संकल्प केला आहे तोच संकल्प तुम्हीही करून प्रचारात अग्रेसर राहून शिवसेनेचा उमेदवार निवडून कसा येईल त्याकडे लक्ष द्या असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना ईडीच्या माध्यमातून किती त्रास दिला आहे. तरीसुध्दा ते भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षाच्या साथीने लढत देत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी काहीवेळा तडजोडी कराव्या लागतात. मित्रपक्षांना काही जागा द्याव्या लागतात. त्यानुसार ही जागा ठाकरे यांच्याकडे गेली आहे. त्यांचा अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील हे आहेत. त्यांच्याच प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.